बळीराजाची लोकशाहीला अनोखी सलामी! मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारावर बांधले 'कांद्याचे तोरण'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 13:39 IST2026-02-07T13:37:51+5:302026-02-07T13:39:00+5:30
मतदारांनी या तोरणासोबत सेल्फी घेत "लोकशाही आणि शेती" यांचा हा सुंदर संगम सोशल मीडियावर शेअर केला.

बळीराजाची लोकशाहीला अनोखी सलामी! मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारावर बांधले 'कांद्याचे तोरण'
- बालाजी बिराजदार
लोहारा (जि. धाराशिव): जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी आज शनिवारी सर्वत्र उत्साहात मतदान पार पडत आहे. मात्र, लोहारा तालुक्यातील सालेगाव येथील मतदान केंद्रावर एक अतिशय वेगळे आणि हृदयस्पर्शी दृश्य पाहायला मिळाले. येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होताना चक्क कांद्याचे तोरण बांधून आपल्या कृषी संस्कृतीचा आणि कष्टाचा सन्मान केला आहे.
"माझा गाव, माझा अभिमान"
सालेगाव हे तालुक्यात प्रगत कांदा उत्पादक गाव म्हणून ओळखले जाते. शेतकऱ्यांसाठी कांदा हे केवळ पीक नसून त्यांच्या जीवनाचे अर्थकारण आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहे. त्यामुळेच, सालेगावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांचे स्वागत करण्यासाठी गावकऱ्यांनी फुलांच्या ऐवजी आपल्या कष्टाचे प्रतीक असलेल्या कांद्याचे तोरण प्रवेशद्वारावर लावले.
सोशल मीडियावर फोटो व्हायरल
मतदानासाठी येणारे नागरिक या अनोख्या तोरणाकडे कुतूहलाने पाहत होते. अनेक तरुण मतदारांनी या तोरणासोबत सेल्फी घेत "लोकशाही आणि शेती" यांचा हा सुंदर संगम सोशल मीडियावर शेअर केला. "लोकशाहीचा हक्क बजावताना आम्ही आमच्या मातीशी आणि कष्टाशी असलेले नाते कधीच विसरत नाही," अशी भावना एका स्थानिक शेतकऱ्याने व्यक्त केली.
प्रशासनाचे देखील कौतुक
प्रशासकीय अधिकारी आणि पोलिसांनीही सालेगावकरांच्या या कल्पकतेचे कौतुक केले आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असताना, सालेगावच्या या 'कांदा तोरणा'ने मात्र एक सकारात्मक संदेश दिला आहे.