Dharashiv: खेळताना पाय घसरला अन् पाझर तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा अंत झाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 11:20 IST2025-07-29T11:19:55+5:302025-07-29T11:20:49+5:30
शेतातून मुले कुठे गायब झाली म्हणून दोघांच्याही आईनी शोध घेतला असता पाझर तलावात आढळले मृतदेह

Dharashiv: खेळताना पाय घसरला अन् पाझर तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा अंत झाला
उमरगा : तालुक्यातील शिवाजी नगर तांडा (दाळिंब) येथील दोघा चिमुकल्यांचा तलावातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी नगर तांडा (दाळिंब) येथील सुशांत बाळू चव्हाण (वय ६) व प्रमोद बालसिंग चव्हाण (वय ७) ही शाळकरी मुले सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास गाव परिसरात आई कामासाठी गेलेल्या शेतात गेली होती. आई शेतात काम करीत असताना हे दोघेही शेताशेजारील येलोरे यांच्या शेताजवळील पाझर तलावानजीक खेळत-खेळत पाण्याजवळ गेले. तिथे पाय घसरून पाण्यात पडल्याने दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.
दरम्यान, शेतातून मुले कुठे गायब झाली म्हणून दोघांच्याही आईनी त्यांचा शोध घेतला. शेवटी सायंकाळी पाच वाजता पाझर तलावात एका मुलाचा शर्ट पाण्यावर तरंगत असल्याचे दिसले. यानंतर या दोघांनाही तलावातून बाहेर काढून तत्काळ दाळिंब येथील प्राथमिक रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्यांना येणेगूर येथील सरकारी दवाखान्यात घेऊन जाण्यास सांगितले. येणेगूर येथे सरकारी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी दोघांनाही मयत घोषित केले. त्यानंतर शवविच्छेदन करून दोन्ही चिमुकल्यांवर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.