Dharashiv: १५ मिनिटांत तुळजापूर महामार्गावर २ दरोडे; कट्ट्याच्या धाकावर भाविकांना लुटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 19:05 IST2025-10-25T19:02:05+5:302025-10-25T19:05:37+5:30
या हल्ल्यात एका भाविकाला गंभीर दुखापत झाली असून, परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Dharashiv: १५ मिनिटांत तुळजापूर महामार्गावर २ दरोडे; कट्ट्याच्या धाकावर भाविकांना लुटले
तुळजापूर (जि. धाराशिव) : तुळजाभवानी आणि विठ्ठलाच्या दर्शनासाठी ये-जा करणाऱ्या भाविकांच्या दोन कारवर २५ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी हल्ला करून दरोडा टाकल्याची थरारक घटना घडली आहे. अवघ्या १५ मिनिटांच्या फरकाने तुळजापूर-सोलापूर महामार्गावर दोन ठिकाणी दरोडा टाकण्यात आला. चोरट्यांनी चाकू आणि कट्टासदृश वस्तूचा धाक दाखवून सोनं, रोकड आणि मोबाइल असा एकूण २ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या हल्ल्यात एका भाविकाला गंभीर दुखापत झाली असून, परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
पहिली घटना पहाटे ३:१५ वाजता सिंदफळनजीकच्या सर्व्हिस रस्त्यावर घडली. सातारा जिल्ह्यातील संदीप रघुनाथ आटोळे हे कुटुंबासह तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जात असताना, गाडी थांबवली असता दोन मोटारसायकलवरील चार चोरट्यांनी चाकू-कट्ट्याचा धाक दाखवला. त्यांनी महिलांच्या गळ्यातील १ लाख ३५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लुटले. या घटनेनंतर अवघ्या १५ मिनिटांत, म्हणजेच पहाटे ३:३० वाजता सोलापूर महामार्गावर ‘हॉटेल राजगड’समोर दुसरी घटना घडली. निलंगा (जि. लातूर) येथील सतीश वीरनाथ बिडवे हे कुटुंबासह पंढरपूरला जात असताना गाडी थांबवल्यावर चार चोरट्यांनी त्यांना लुटले. विरोध केल्याने चोरट्यांनी बिडवे यांच्यावर चाकूने वार करून आणि ठोसा मारून त्यांना जखमी केले. या दरोड्यात ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटला गेला. सतीश विरनाथ बिडवे यांच्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलिस ठाण्यात चार अज्ञात चोरट्यांविरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०९(६) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.
विशेष पथके रवाना...
पोलिसांनी तपासासाठी विशेष पथके नेमली आहेत आणि सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. दोन्ही घटनांतील चोरट्यांचे वर्णन सारखे असल्याने ही एकाच टोळीची कारवाई असल्याचा पोलिसांना संशय आहे. यापूर्वी २० ऑक्टोबर रोजी झालेल्या दरोड्याचा तपास लागलेला नसतानाच, या सलग घटनांमुळे महामार्गावरील गस्त वाढवण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे.