Dharashiv: तुळजापूर एमडी ड्रग्ज प्रकरणात आणखी दोन तस्करांना बेड्या, दोघे फरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 18:36 IST2025-03-25T18:36:09+5:302025-03-25T18:36:33+5:30
१३ दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे न्यायालयाचे आदेश

Dharashiv: तुळजापूर एमडी ड्रग्ज प्रकरणात आणखी दोन तस्करांना बेड्या, दोघे फरार
तामलवाडी (जि. धाराशिव) : एम. डी. ड्रग्ज प्रकरणात तपासाला आणखी गती देत तामलवाडी पोलिसांनी आणखी दोन ड्रग्ज तस्करांना गजाआड केले आहे. हे दोन्ही आरोपी पुणे व सोलापूर शहरातील आहेत. त्यांना सोमवारी न्यायालयाने १३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
तुळजापूर शहरासह सोलापूर, पुणे शहरात ड्रग्ज तस्करांचे कनेक्शन उघड झाले आहे. तामलवाडी पोलिसांनी आतापर्यंत १० जणांना अटक केली असून, न्यायालयाच्या आदेशानुसार ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. स्वराज ऊर्फ पिनू तेलंग (रा. तुळजापूर) व वैभव गोळे (रा. मुंबई) हे दोघे फरार आहेत. दरम्यान, या प्रकरणाच्या तपासात आणखी दोन तस्करांची नावे पोलिसांसमोर आली. त्यांच्यावर पाळत ठेऊन सोमवारी पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतले आहे.
पुणे येथील सुलतान ऊर्फ टिपू शेख यास तो सध्या वास्तव्यास असलेल्या नळदुर्ग शहरातून ताब्यात घेण्यात आले. तर जीवन नागनाथ साळुंके (रा. सलगर वस्ती, सोलापूर) यास सोलापूर शहरातून सोमवारी पहाटे ताब्यात घेण्यात आले. या दोघांनाही न्यायालयाने १३ दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, ड्रग्ज प्रकरणात तुळजापूर येथील आणखी एक आरोपी निष्पन्न झाला असून, तो सध्या फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा तपास सपोनि गोकुळ ठाकूर हे करीत आहेत.
गांजा पिताना पकडला आरोपी
तामलवाडी पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणात ताब्यात घेतलेला आरोपी सुलतान उर्फ टिपू शेख हा गांजाचे सेवन करताना सापडला. नळदुर्ग पोलिसांची रविवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास पेट्रोलिंग सुरु असताना नळदुर्ग-अक्कलकोट रोडवरील एका फंक्शन हॉलसमोर हा आरोपी गांजा पीत असल्याने दिसून आल्यानंतर पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तो ड्रग्ज तस्करीतही सक्रिय असल्याचे समजल्यानंतर आरोपीचा ताबा तामलवाडी पोलिसांकडे देण्यात आला.