चाैदा ‘सीसीटीव्ही’ ची नजर चुकवून चाेरट्यांनी डाव साधला; घरफोडीत लाखोंचा ऐवज लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 13:58 IST2025-05-02T13:57:39+5:302025-05-02T13:58:52+5:30
गावात चाैदा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र, या सर्व कॅमेऱ्यांची नजर चुकवून चाेरट्यांनी घर फाेडले.

चाैदा ‘सीसीटीव्ही’ ची नजर चुकवून चाेरट्यांनी डाव साधला; घरफोडीत लाखोंचा ऐवज लंपास
तामलवाडी ( धाराशिव) : तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी ग्रामपंचायतीने गावात चाैदा सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. या सर्व कॅमेऱ्यांची नजर चुकवून चाेरट्यांनी डाव साधला. बंद घराच्या दरवाजावरील कडी-काेयंडा ताेडून आतील साेन्या-चांदीचे दागिन्यांसह २ लाख ३० हजारांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आली.
पांगरदरवाडी येथील पाण्याच्या टाकीजवळ शंकर डोंगरे यांचे घर आहे. सोमवारी रात्री कुंटुंबातील सदस्य जेवण करून झोपण्यासाठी घराच्या स्लॅबवर गेले हाेते. घर बंद असल्याची संधी साधत अज्ञातांनी दरवाजावरील कडी-काेयंडा ताेडून आत प्रवेश केला. यानंतर कपाट ताेडून आतील साेन्या-चांदीचे दागिने व राेख रक्कम मिळून सुमारे ३ लाख ३० हजार रूपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आली. यानंतर डोंगरे यांनी तामलवाडी पोलिस ठाण्याला घटनेची माहिती दिली. त्यानुसार दुपारी बारा वाजता फॉरेन्सिक व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. पथकाने घटनास्थळाची पाहणी करून चाेरट्यांचा माग शाेधण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी शंकर डाेंगरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तामलवाडी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सपाेफाै विनायक सरगुले हे करीत आहेत.
एकाही कॅमेऱ्यात झाले नाहीत कैद
पांगरदरवाडी ग्रामपंचायतीने पुढाकार घेत गावात चाैदा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र, या सर्व कॅमेऱ्यांची नजर चुकवून चाेरट्यांनी घर फाेडले. या घटनेमुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण आहे.