Dharashiv: गोवंश हत्या कायदा रद्द करा, शेतकरी कर्जमाफीसाठी लोहाऱ्यात मुकमोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 16:17 IST2025-09-02T16:17:08+5:302025-09-02T16:17:55+5:30
शेतकरी, व्यापारी आणि कुरेशी समाज एकवटला

Dharashiv: गोवंश हत्या कायदा रद्द करा, शेतकरी कर्जमाफीसाठी लोहाऱ्यात मुकमोर्चा
- बालाजी बिराजदार
लोहारा (धाराशिव) : विविध मागण्यांसाठी लोहारा शहरासह तालुक्यातील शेतकरी, कुरेशी समाज, व्यापारी व वाहनचालकांनी आज, मंगळवारी दुपारी लोहारा तहसिल कार्यालयावर मूक मोर्चा काढत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून मूक मोर्चा सुरुवात करण्यात आली. हातात तिरंगा झेंडा, मागण्याचे फलक तसेच डोक्यावर भगवी, निळी टोपी, गळ्यात गमजा घालून मोर्चेकरी महात्मा फुले चौक, आंबेडकर चौक, आझाद चौक, जगदंबा मंदिरमार्गे तहसील कार्यालयावर धडकले.
आंदोलकांनी तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन दिलासा द्यावा, तसेच महाराष्ट्रात २०१५ साली लागू करण्यात आलेला गोवंश हत्या बंदी (सुधारित) कायदा तातडीने रद्द करावा, अशी ठाम मागणी करण्यात आली. गोरक्षकांच्या नावाखाली होत असलेली जनावरांची वाहतूक अडवणे, लूटमार, मारहाण आणि हत्या यावर कठोर कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली. तसेच या कायद्यामुळे शेतकऱ्यांच्या भाकड जनावरांचा प्रश्न गंभीर बनला असून खरेदी-विक्री ठप्प झाली आहे. व्यापारी व कुरेशी समाजाचा उदरनिर्वाह धोक्यात आला आहे. राज्यातील गोशाळांची तपासणी करून खरी संख्या उघड करावी, तसेच परवानाधारक जनावरांसाठी प्रत्येक नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रात अद्यावत कत्तलखाने उपलब्ध करून द्यावेत, असे निवेदनात म्हटले आहे.
मुकमोर्चात खलीफा कुरेशी, मसुद शेख, अमिन सुंबेकर, अमिन कुरेशी, सलीम कुरेशी, बाळासाहेब पाटील, जाकीर कुरेशी, महेबुब कुरेशी, आयुब शेख टेलर, श्रीकांत भरारे, शब्बीर गवंडी, रविकिरण बनसोडे, अभिमान खराडे, आयनोद्दीन सवार, महेबुब गवंडी, सलिम शेख, अमोल बिराजदार, विजयकुमार ढगे, के.डी. पाटील, दिपक रोडगे, ओम पाटील, प्रशांत काळे, आरीफ खानापुरे, गौस मोमिन, महमंदी हिप्परगे, गोरख लोखंडे, राजेंद्र कदम, बसवराज पाटील, मल्लिनाथ घोगडे, पप्पू स्वामी, खुन्नमीर मोमिन यांच्यासह शेतकरी, कुरेशी समाज, व्यापारी व वाहनचालक ही मोठ्यासंख्येने उपस्थित झाले होते.