Dharashiv: कृषी विभागाच्या भरारी पथकाचा छापा, शेडमधून साडेचारशे पोते खत जप्त
By बाबुराव चव्हाण | Updated: May 16, 2025 11:12 IST2025-05-16T11:12:11+5:302025-05-16T11:12:26+5:30
या कारवाईत विविध कंपन्यांचे सुमारे ४५६ होते खत जप्त करण्यात आले, ज्याची किंमत ४ लाख ६१ हजार १२० रुपये आहे.

Dharashiv: कृषी विभागाच्या भरारी पथकाचा छापा, शेडमधून साडेचारशे पोते खत जप्त
धाराशिव : वाशी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या भरारी पथकाने गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता पिंपळगाव लिंगी शिवारातील कुक्कुटपालनाच्या शेडमध्ये छापा टाकून सुमारे साडेचारशे पोते खत जप्त केले. याप्रकरणी शुक्रवारी पहाटे वाशी पोलीस ठाण्यात दोघाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
वाशी पंचायत समितीचे कृषी अधिकारी अविनाश शिवाजी माळी व भरारी पथकाचे प्रमुख तथा खत निरीक्षक राजाराम धनाजी बर्वे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता पिंपळगाव लिंगी येथील दसमेगाव रस्त्याच्या पश्चिमेला अंदाजे सातशे मीटर अंतरावर असलेल्या एका कुक्कुटपालनाच्या शेडमध्ये अचानक छापा मारला. या कारवाईत विविध कंपन्यांचे सुमारे ४५६ होते खत जप्त करण्यात आले, ज्याची किंमत ४ लाख ६१ हजार १२० रुपये आहे.
यापैकी काही खत परवाना नसणारे म्हणजेच बनावट आहे, तर काही खत अनधिकृतपणे साठा केलेले असल्याचे समोर आले. याप्रकरणी कृषी विभागाने दिलेल्या फिर्यादीवरून वाशी पोलीस ठाण्यात दत्तात्रय लिंबराज तावरे (रा. लिंगी पिंपळगाव), विकास रामभाऊ होळे (रा. खामकरवाडी) या दोघाविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल झाला आहे. पथकात जिल्हा परिषदेचे प्रभारी कृषी विकास अधिकारी प्रमोद राठोड, मोहीम अधिकारी दीपक गरगडे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक प्रवीण पाटील यांचा समावेश होता.