Dharashiv: रस्ता कामावरून वाद पुन्हा चिघळला, थेट कोयता, सुऱ्याने हल्ला; एकजण गंभीर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 12:38 IST2025-12-17T12:37:54+5:302025-12-17T12:38:49+5:30
पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत लाठीचार्ज करीत दोघांना ताब्यात घेतले.

Dharashiv: रस्ता कामावरून वाद पुन्हा चिघळला, थेट कोयता, सुऱ्याने हल्ला; एकजण गंभीर!
तुळजापूर (जि. धाराशिव) : नळदुर्ग रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामावरून दोन गटांमध्ये झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर थेट कोयता व धारदार सुऱ्याने हल्ल्यात झाले. या घटनेत कुलदीप मगर हा तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी लोहिया मंगल कार्यालय परिसरात घडली. दरम्यान, पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत लाठीचार्ज करीत दोघांना ताब्यात घेतले.
मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूर-नळदुर्ग रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सध्या सुरू असून, याच्या दर्जाबाबत शहरातील एका गटाने संबंधित अभियंत्याकडे तक्रार केली होती. याच दरम्यान रस्त्याच्या ठेकेदाराचे नातेवाईक तेथे पोहोचले. यावेळी दोन्ही गटांमध्ये शाब्दिक वाद झाला. पुढे किरकोळ मारहाणही झाली. मात्र, उपस्थितांनी मध्यस्थी करून भांडण मिटवले आणि दोन्ही गट तेथून निघून गेले. दरम्यान, काही वेळानंतर तक्रार करण्यासाठी आलेल्या गटातील तरुणांनी दुचाकींवरून हातात कोयते व धारदार सुरे घेऊन लोहिया मंगल कार्यालय परिसर गाठला. तेथे समोरच्या गटातील कुलदीप मगर रस्त्याने जात असताना त्यांच्यावर हल्ला चढवीत डोक्यात कोयत्याने वार केले. या हल्ल्यात मगर रक्तबंबाळ होऊन गंभीर जखमी झाले. जखमी कुलदीप मगर यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना सोलापूर येथे हलविण्यात आले आहे. या घटनेनंतर काही काळ शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
पोलिसांचा लाठीचार्ज
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश देशमुख, पोलिस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, पोलिस कर्मचारी संतोष करवार, अमोल पवार यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज केला. यावेळी जखमी मगर आणि त्यांच्या कुटुंबातील काही तरुणांनी दोघा संशयितांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
भाजप-काँग्रेस पक्षाचे समर्थक आमनेसामने
रस्त्याच्या कामावरून झालेल्या या वादाला राजकीय संदर्भ जोडला जात असून, भिडलेले दोन्ही गट भाजप व काँग्रेस समर्थक असल्याची चर्चा आहे. दोन्ही गटांशी संबंधित नेते हे पालिका निवडणुकीतील नगराध्यक्ष पदाच्या प्रमुख लढतीतील असल्याने, ही घटना निवडणूकपूर्व राजकीय तणावाचे प्रतीक मानली जात आहे. साध्या तक्रारीचे रूपांतर थेट शक्तिप्रदर्शनात आणि पुढे हिंसक घटनेत झाल्याने तुळजापुरात तणाव निर्माण झाला.