Dharashiv: शिपाईचं निघाला चोर, शांत डोक्याने बँकेतून उडवला २ कोटींचा ऐवज
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 17:46 IST2025-10-15T17:45:45+5:302025-10-15T17:46:03+5:30
नागपुरातून आवळल्या गुन्हे शाखेने मुसक्या; तुळजापूर येथील लोकमंगल मल्टिस्टेट बँकेत चोरी झाल्याचा प्रकार ३ ऑगस्ट रोजी उघडकीस आला होता.

Dharashiv: शिपाईचं निघाला चोर, शांत डोक्याने बँकेतून उडवला २ कोटींचा ऐवज
धाराशिव : तब्बल सहा महिन्यांपासून प्लॅनिंग करीत तुळजापुरातील लोकमंगल मल्टिस्टेट बँकेतील २ कोटी १३ लाखांचा ऐवज पळविणारा दुसरा तिसरा कोणी नसून, बँकेचा शिपाईच निष्पन्न झाला आहे. एखाद्या निष्णात गुन्हेगाराप्रमाणे दोन महिने आपला ठावठिकाणा लागू न देणाऱ्या या शिपायास अखेर गुन्हे शाखेच्या पथकाने नागपुरातून बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून २ किलोहून अधिक सोने व रोकड ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मंगळवारी पोलिस अधीक्षक रितू खोकर यांनी दिली.
तुळजापूर येथील लोकमंगल मल्टिस्टेट बँकेत चोरी झाल्याचा प्रकार ३ ऑगस्ट रोजी उघडकीस आला होता. गरजेपोटी तारण म्हणून ठेवलेले तब्बल २ किलो ७२२ ग्रॅम सोने व ३४ लाख ६० हजारांची रोकड, असा २ कोटी १३ लाख रुपयांचा ऐवज घेऊन चोरट्याने पळ काढल्याची तक्रार तुळजापूर ठाण्यात देण्यात आली होती. जुन्हा दाखल केल्यानंतर गुन्ह्याचे स्वरुप लक्षात घेत पोलिस अधीक्षक रितू खोकर यांनी या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार व त्यांच्या पथकाने दोन महिने अविरत प्रयत्न करून अखेर चोरट्याचा माग काढलाच. त्यास दोन दिवसांपूर्वीच नागपुरातून बेड्या ठोकण्यात आल्या. सध्या तो ५ दिवसांच्या पोलिस कोठडीत असल्याचे पोनि. इज्जपवार यांनी सांगितले.
कोल्डब्लडेड क्राइम
आरोपी दत्ता नागनाथ कांबळे हा या बँकेत शिपाई म्हणून काम करीत होता, बँकेतील व्यवहार, रोकड, तारणाचे सोने हे सगळे त्याच्या नजरेसमोर होते. जवळपास सहा महिने पाळत ठेवून मोठा ऐवज जमल्यानंतर त्याने शांतचित्ताने २ कोटी १३ लाखांचा ऐवज उडवला.
शेवटी सापडलाच, मुद्देमालही दिला
शेवटी गुन्हे शाखेने आपल्या नेटवर्कचा वापर करीत आरोपीस नागपुरातून बेड्या ठोकल्या. त्याने ११ लाखांची रोकड व २ किलो १५२ ग्रॅम सोने काढून दिले. काही रक्कम खर्च झाल्याचे सांगितले. सोने इतकेच असल्याचा आरोपीचा दावा आहे. चौकशीअंती सत्य बाहेर येईल, असे पोलिस अधीक्षक रितू खोकर म्हणाल्या.
ऐवज जमण्याची वाट पाहिली
फेब्रुवारी महित्यात पहिल्यांदा आरोपीला चोरीचा विचार मनात आला. सहा महिने प्लॅनिंग करीत मोठ्या प्रमाणात ऐवज जमण्याची वाट पाहिली. ऑगस्टमध्ये रोकड व सोने भरपूर जमा झाल्यानंतर त्याने ३ ऑगस्ट रोजी हा ऐवज घेऊन पळ काढला.
चकवा देण्याचे वापरले सर्व हातखंडे
चोरी केल्याच्या दिवसापासून त्याने त्याचा मोबाइल वापरणे बंद केले. यामुळे पोलिसांना माग काढणे जिकरीचे झाले. बँकेतील सीसीटीव्हीला चकवा देण्याचे मार्गही त्याने ज्ञात करून घेतले होते. याहीपुढे जाऊन बँकेत सापडलेल्या एका आधार कार्डाच्या मदतीने रेल्वे व इतर प्रवासाचे बुकिंग केले. कोठेही त्याचे नाव येऊ दिले नाही.