धाराशिव-तुळजापूर मार्गावर भाविकांची वाहने अडवून लुटमार; दागिने, रोकड, मोबाइल पळवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 14:05 IST2025-04-11T14:04:52+5:302025-04-11T14:05:09+5:30
घटनेच्या अडीच ते तीन तासांतच पाेलिसांनी संशयित चाैघांना ताब्यात घेतले आहे. तर इतरांच्या शाेधात पथके रवाना करण्यात आली आहेत.

धाराशिव-तुळजापूर मार्गावर भाविकांची वाहने अडवून लुटमार; दागिने, रोकड, मोबाइल पळवले
धाराशिव/तुळजापूर : धाराशिव-तुळजापूर मार्गावरील कावलदरा येथील एका मंगल कार्यालयानजीक गुरुवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास सात ते आठ दराेडेखाेरांनी वाहने अडवून भाविकांसह प्रवाशांची लुटमार केली. त्यांच्याकडील राेकड, दागिने तसेच महागडे माेबाइल घेऊन दराेडेखाेर पसार झाले. या प्रकरणी आठजणांविरूद्ध धाराशिव ग्रामीण पाेलिस ठाण्यात गुन्हा नाेंदविण्यात आला आहे. दरम्यान, घटनेच्या अडीच ते तीन तासांतच पाेलिसांनी संशयित चाैघांना ताब्यात घेतले आहे. तर इतरांच्या शाेधात पथके रवाना करण्यात आली आहेत.
धाराशिव-तुळजापूर मार्गावरील एका मंगल कार्यालयापासून काही अंतरावर छाेटा तलाव आहे. या तलावावरील उड्डाणपुलानजीक सात ते आठ दराेडेखाेर गुरुवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास दबा धरून बसले हाेते. अंधाराचा फायदा घेत त्यांनी रस्त्यावर लाेखंडी जॅक टाकले. या जॅकमुळे एका कारचे टायर फुटले. तर उर्वरित दाेन ते तीन वाहनांच्या चालकांनी चाकात काहीतरी अडकले, असे समजून वाहने थांबविली.
हीच संधी साधत ताेंडावर रूमाल बांधलेल्या दराेडेखाेरांनी प्रवासी तसेच भाविकांवर हल्ला केला. महिलांच्या गळ्यातील दागिने, राेकड तसेच महागडे माेबाइल घेऊन ते पसार झाले. या प्रकरणी धाराशिव ग्रामीण पाेलिस ठाण्यात अज्ञात आठजणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, घटनेनंतर पाेलिसांनी तपासाची चक्रे फिरवीत संशयित चाैघांना ताब्यात घेतले. तर इतरांच्या शाेधात पाेलिसांची पथके रवाना झाली आहेत. या घटनेमुळे श्री तुळजाभवानी देवी भाविकांसह प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.