आठ दिवस शेतात राबून लेकींची पित्याला श्रद्धांजली; एकट्या पडलेल्या आईला दिली खंबीर साथ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 13:10 IST2025-10-31T13:09:29+5:302025-10-31T13:10:41+5:30
भावाचा, पित्याचा मृत्यू... पण आई हतबल नाही! मावशीच्या प्रेरणेने पाच भगिनींची 'एकजूट' पाहून गाव गहिवरले

आठ दिवस शेतात राबून लेकींची पित्याला श्रद्धांजली; एकट्या पडलेल्या आईला दिली खंबीर साथ!
धाराशिव : पित्याच्या मृत्यूनंतर आधार हरवलेल्या आईची सावली बनण्याचा निर्धार करून दु:ख पचवीत पाच लेकींनी आठ दिवस शेतात राबून पित्याला श्रद्धांजली वाहिल्याचा कौतुकास्पद प्रसंग कौडगाव येथून उजेडात आला आहे. एकुलत्या भावाचा अन् पुढे वडिलांचाही मृत्यू झाल्याने हतबल झालेल्या पदर खोचून या भगिनींना तिच्या पाठीशी सावलीप्रमाणे राहण्याचा निर्धार या प्रसंगातून व्यक्त केला आहे.
धाराशिव तालुक्यातील कौडगाव येथील चंद्रभान शिवाजी थोरात (८८) यांचे १५ ऑक्टोबरला वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, पाच मुली, जावई, नातवंडे, असा परिवार आहे. स्व. चंद्रभान व सखूबाई थोरात हे अल्पभूधारक शेतकरी. या दाम्पत्याला पहिल्या पाच मुलीच झाल्या. नवस, व्रतवैकल्ये करून सहाव्या वेळी मुलाची प्राप्ती त्यांना झाली. पाचही मुलींची लग्ने करून दिल्यानंतर उमेदीच्या वयात मुलगा समाधानचेही लग्न उरकून टाकले. समाधानला पुढे श्रावणी ही एक मुलगी झाली. मात्र, त्याच्या आजारपणामुळे पत्नीने साथ सोडली. पुढे समाधाननेही देह टाकला. अनाथ झालेल्या श्रावणीला मुंबईत राहणाऱ्या आत्याने आधार दिला. इकडे गावी चंद्रभान व सखूबाई थोरात हे आपली अल्पजमीन कसून उदरनिर्वाह चालवत होते. यातच ऐन दिवाळीच्या काळात चंद्रभान थोरात यांनी अखेरचा श्वास घेतला. यामुळे एकट्या पडलेल्या आईला धीर देण्यासाठी मावशीच्या प्रेरणेतून पाचही लेकींनी श्राद्धाच्या दिवसापर्यंत शेतात श्रमदान करुन आईच्या पाठीशी खंबीर असल्याचा संदेश दिला. थोरात कुटुंबातील या प्रसंगाने अख्खे गाव गहिवरले.
लेकींनी फोडला टाहो, मावशीने सावरले
चंद्रभान थोरात यांच्या निधनाचे वृत्त कळल्यानंतर अंत्यविधीसाठी जमलेल्या त्यांच्या लेकी उषा गोरख चौधरी, रुक्मिणी सूर्यकांत येवले, लता विठ्ठल येवले, अंजली विलास लोकरे, मनीषा विष्णू जगताप यांनी टाहो फोडला होता. आता आईचे कसे होईल, ही विवंचना त्यांच्या अश्रुतून वाहत होती. यावेळी त्यांच्या मावशी जळकोटवाडी येथील कमल प्रल्हाद पाटील यांनी त्यांना सावरले.
सोयाबीनची मळणी ते कांदा खुरपणी
कमल पाटील यांनी पाचही लेकींना समजावत आईला खंबीरपणे उभे करण्यासाठी तिला साथ देऊया, असे सांगितले. अंत्यविधीनंतर चौथ्याच दिवशी स्वत: कमल पाटील या पाच लेकींना घेऊन शेतात गेल्या. आठ दिवसांत सोयाबीनची काढणी, मळणी करण्यापासून ते कांदा खुरपणी व पडेल ते काम करून पित्याला अनोखी श्रद्धांजली वाहिली.
गावाचीही कुटुंबाला खंबीर साथ
थोरात कुटुंबावर ओढवलेला प्रसंग पाहून गाव हळहळले. घरात कोणी कर्तापुरुष नसल्याने सरपंच दयानंद थोरात, ग्रामपंचायत अधिकारी विद्या ओहोळ यांनी स्व.चंद्रभान थोरात यांच्या मृत्यूची नोंद घेत घरपोच दाखला दिला. पुढेही आवश्यक त्या सर्व शासकीय कामकाजात मदत करण्याचा निश्चय त्यांनी केला.