पूजा गायकवाड नर्तकी असलेल्या वादग्रस्त तुळजाई कला केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 13:55 IST2025-09-18T13:53:47+5:302025-09-18T13:55:49+5:30
बेकायदेशीर कृत्ये आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न; वादग्रस्त 'तुळजाई' कला केंद्रावर अखेर कायमची बंदी

पूजा गायकवाड नर्तकी असलेल्या वादग्रस्त तुळजाई कला केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द
धाराशिव : बीड जिल्ह्यातील उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणाने प्रकाशझोतात आलेल्या धाराशिवच्या तुळजाई कला केंद्राचा परवाना अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी कायमस्वरूपी रद्द केला आहे. याच कला केंद्रातील नर्तकी पूजा गायकवाड ही बर्गे यांच्या आत्महत्या प्रकरणात मुख्य आरोपी आहे.
वाशी तालुक्यातील पिंपळगाव येथे तीन वर्षांपासून तुळजाई कला केंद्र सुरू होते. याच कला केंद्रातील नर्तकी पूजा गायकवाड ही लुखामसल्याचे उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्या प्रकरणात मुख्य आरोपी आहे. दरम्यान, या कला केंद्रावर परवान्यातील अटी व नियमांचे उल्लंघन होत असल्याचा ठपका ठेवून वाशीच्या तहसीलदारांनी अडीच महिन्यांपूर्वी परवाना निलंबित केला होता. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयातून त्यास स्थगिती मिळवून घेण्यात आली होती.
मात्र, आता वाशी पोलिसांनीच कायदा व सुव्यवस्थेचा हवाला देत परवाना रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयास पाठवून दिला होता. त्यात या कला केंद्रामुळे विनयभंग, अवैध मद्य विक्री, आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे गुन्हे नोंद झाले आहेत. शिवाय, स्थानिक महिलांनी गावातील तरुणाई बिघडत असल्याचा दावा करीत उठाव केला असल्याचे संदर्भ पोलिसांनी प्रस्तावात दिले होते. याअनुषंगाने जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी तुळजाई कला केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचे आदेश काढले आहेत.