पिकांचे अताेनात नुकसान, पंचनामे कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:33 IST2021-08-15T04:33:40+5:302021-08-15T04:33:40+5:30
उस्मानाबाद : भूम तालुक्यात सरासरीच्या अत्यल्प पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीप हंगामातील उडीद, मूग ही पिके वाया गेल्यात जमा ...

पिकांचे अताेनात नुकसान, पंचनामे कधी?
उस्मानाबाद : भूम तालुक्यात सरासरीच्या अत्यल्प पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीप हंगामातील उडीद, मूग ही पिके वाया गेल्यात जमा आहेत, तर साेयाबीनही वाया जाण्याच्या मार्गावर आहे. असे असतानाही प्रशासनाकडून पंचनाम्यास गती देण्यात आलेली नाही. परिणामी, शेतकऱ्यांतून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
मागील काही वर्षांत भूमसह ईट परिसरातील शेतकरी साेयाबीनकडे वळले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा साेयाबीनचा पेरा वाढला आहे. पेरणी व पेरणीनंतर अधून-मधून पाऊस झाला. साेयाबीनसह उडीद, मूग आदी पिके जाेमदार आली. दरम्यान, ही पिके फुले व शेंगा लागण्याच्या अवस्थेत असतानाच पावसाने ओढ दिली आहे. जवळपास २० ते २१ दिवस लाेटूनही पाऊस न झाल्याने उडीद, मूग वाया गेल्यात जमा आहे, तर साेयाबीनही वाया जाण्याच्या मार्गावर आहे. अशा वेळी प्रशासनाने तातडीने पंचनामे करण्याची गरज आहे, परंतु ईटसह परिसरात अद्याप ही प्रक्रिया गतिमान हाेताना दिसत नाही. अनेक शेतकरी गाव स्तरावरील संबंधित अधिकाऱ्यांना फाेन करून पंचनामे करण्यासाठी विनंती करीत आहेत, परंतु त्याचाही फारसा परिणाम हाेताना दिसत नाहीत. प्रशासनाच्या या असहकार भूमिकेमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
चाैकट...
भूम तालुक्यातील आंबी मंडळात आजवर केवळ १४३ मिमी पाऊस झाला आहे, तसेच माणकेश्वर १९०, भूम २३९.७०, वालवड १७५.८० तर ईट सर्कलमध्ये अवघा १५१.६० मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्यामुळे ईटसह परिसरातील पिकांना अधिक फटका असला आहे. ही बाब लक्षात घेता, तातडीने पंचनामे करणे गरजेचे आहे.
प्रतिक्रिया...
तातडीने पंचनामे सुरू करा - प्रवीण देशमुख
ईटसह परिसरातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. माळरानावरील पिकांचा अक्षरश: पाचाेळा झाला आहे. असे असतानाही नुकसानीचे पंचनामे हाेताना दिसत नाहीत. प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यामुळे तातडीने पंचनामे करण्याचे संबंधित यंत्रणेला आदेश द्यावेत, अशी मागणी ईट ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा सदस्य प्रवीण देशमुख यांच्यासह शेतकऱ्यांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहेत. निवेदनावर महिंद्र लिमकर, आण्णा शिंदे, राहुल सूळ, मिटू डाेंबाळे, सचिन स्वामी, कुमार खारगे, बाळासाहेब आव्हाड, सतीश नलावडे, सयाजी नलावडे, रामहरी लिमकर, संताेष खारगे, सूरज खारगे, गाैरव वालेकर, विक्रम हुंबे आदींची नावेत आहेत.