शाळांतील उपस्थितीत दिवसागणिक भर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:59 IST2021-02-06T04:59:01+5:302021-02-06T04:59:01+5:30

भूम (जि. उस्मानाबाद) : काेराेनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात नववी ते बरावी, तर दुसऱ्या टप्प्यात पाचवी ते आठवीचे ...

Daily increase in school attendance ... | शाळांतील उपस्थितीत दिवसागणिक भर...

शाळांतील उपस्थितीत दिवसागणिक भर...

भूम (जि. उस्मानाबाद) : काेराेनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात नववी ते बरावी, तर दुसऱ्या टप्प्यात पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. सुरुवातीच्या दिवसांत अपेक्षित उपस्थिती नव्हती; परंतु सध्या दिवसागणिक उपस्थिती वाढू लागली आहे. आजघडीला तालुक्यातील सर्व शाळांतील उपस्थिती ११ हजारांवर जाऊन ठेपली आहे.

भूम तालुक्यात पाचवी ते आठवीच्या जिल्हा परिषद व खासगीसह ९४, तर नववी ते बारावीपर्यंतच्या ३८ शाळा आहे. या सर्व वर्गांचा पट तब्बल १३ हजार १०० एवढा आहे. दरम्यान, काेराेनामुळे या सर्वच शाळा बंद हाेत्या. जवळपास आठ ते नऊ महिने शाळांचे कुलूप उघडले गेले नाही. काेराेनाचा संसर्ग ओसरल्यानंतर शासनाने टप्प्या-टप्प्याने वर्ग उघडण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात म्हणजेच २३ नाेव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले. यानंतर काही दिवसांपूर्वी म्हणजेच २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू केले आहेत. शासनाच्या निर्देशानुसार वर्गखाेल्या सॅनिटाईज करून घेतल्या हाेत्या. प्रत्येकास मास्क बंधनकारक केले आहे. एवढेच नाही, तर विद्यार्थ्यांना वर्गात बसविताना फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले. साेबतच शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन पालकांमध्ये जनजागृती करण्यात आली. त्याचाच परिणाम म्हणून आता पहिल्या दिवसाच्या तुलनेत विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढू लागली आहे. तालुक्यातील नववी ते बारावीच्या वर्गातील एकूण पट पाच हजार १३ एवढा आहे. ४ फेब्रुवारीअखेर यापैकी तीन हजार १२१ विद्यार्थ्यांनी वर्गात हजेरी लावली आहे. म्हणजेच वर्गातील उपस्थिती ७० टक्क्यांवर पाेहाेचली. पाचवी ते आठवीच्या वर्गांचा पट आठ हजार ७० एवढा आहे. २ फेब्रुवारीपर्यंत या वर्गांतील उपस्थिती पाच हजार ३६३ वर पाेहाेचली. येणाऱ्या काळात हा पट आणखी वाढेल, असा विश्वास शिक्षण यंत्रणेकडून व्यक्त करण्यात आला.

चाैकट...

बसेसच्या फेऱ्या बंद असल्याने फटका

शासनाच्या आदेशानुसार एसटी महामंडळाने बससेवा सुरू केली आहे; परंतु तालुक्यातील अनेक गावांत आजही बसेसच्या फेऱ्या बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याची इच्छा असतानाही जाता येत नाही. त्यामुळे अशा गावांतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेऊ लागले आहे. त्यामुळे महामंडळाने पूर्वीप्रमाणे बसेस फेऱ्या सुरू कराव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.

काेट...

२७ जानेवारी रोजी पहिल्याच दिवशी कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करून शाळांना भेटी दिल्या. शाळेतील वर्गखाेल्या सॅनिटाईज केल्या आहेत की नाही, स्वच्छता राखली जातेय का? मास्क, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन याेग्य प्रकारे हाेत आहे की नाही, आदी बाबींची पाहणी करण्यात आली. बहुतांश शाळांनी उपराेक्त उपाययाेजना केल्या आहेत. त्यामुळेच पालकांचा विश्वास बळावला. परिणामी वर्गातील उपस्थितीत सातत्याने वाढ होत आहे.

- सुनील गायकवाड, गटशिक्षण अधिकारी, भूम.

Web Title: Daily increase in school attendance ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.