धाराशिवमध्ये क्रूरतेचा कळस! अमानुष मारहाणीनंतर मृत समजून तरुणाला रस्त्यावर फेकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 14:33 IST2025-03-12T14:31:44+5:302025-03-12T14:33:09+5:30
हा तरुण मृत्यूशी झुंज देत असून, याप्रकरणी परंडा पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

धाराशिवमध्ये क्रूरतेचा कळस! अमानुष मारहाणीनंतर मृत समजून तरुणाला रस्त्यावर फेकले
सोनारी (जि. धाराशिव) : भूम तालुक्यातील पाथ्रुड येथील एका १८ वर्षीय तरुणास क्रूरतेचा कळस गाठत सात ते आठ जणांनी रॉड, काठी तसेच तीक्ष्ण हत्याराने मारहाण केल्यानंतर मृत झाल्याचे समजून त्यास रस्त्याच्या कडेला फेकून दिल्याची घटना मंगळवारी (दि. ११) उजेडात आली आहे. हा तरुण मृत्यूशी झुंज देत असून, याप्रकरणी परंडा पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
भूम तालुक्यातील पाथ्रुड येथील माउली बाबासाहेब गिरी असे अमानुष मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या वडिलांनी परंडा पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, ३ मार्च रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास माउलीचा त्यास परंडा तालुक्यातील पांढरेवाडी येथील सतीश जगताप व इतर सहा ते सात जणांनी लोखंडी रॉड, काठीने जबर मारहाण केल्याचा फोन आला होता. यानंतर त्यास फोन केला असता तो सातत्याने बंद लागत होता. यामुळे बस प्रवासात फिर्यादी वडिलांनी त्यांचे भाऊ व मित्राला याबाबतची माहिती देऊन शोध घेण्याची विनंती केली. दरम्यान, सायंकाळी ५ वाजता काळेवाडी येथील पोलिसपाटलांनी बाबासाहेब गिरी यांना फोन करून त्यांचा मुलगा माउली यास जबर मारहाण करून त्यास नग्नावस्थेत पश्चिम पांढरेवाडी ते कोकणे वस्ती रस्त्यालगत फेकून दिल्याचे सांगितले.
या माहितीवरून माउली याचा शोध घेऊन त्यास त्याच दिवशी जामखेड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, काही दिवसांच्या उपचारानंतरही प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यास सोलापूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे त्याची मृत्यूशी झुंज सुरू आहे. दरम्यान, याबाबत बाबासाहेब गिरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून परंडा ठाण्यात आरोपी सतीश जगताप व अन्य सहा ते सातजणांवर गुन्हा दाखल करून यातील तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मंगळवारी परंडा ठाण्यातून मिळाली.
क्रूरतेचा गाठला कळस
आरोपींनी माउली गिरी यास रॉडने पाठीपासून ते तळपायापर्यंत बेदम मारहाण केली आहे. शिवाय, गुप्तांगालाही तीक्ष्ण वस्तूने गंभीर इजा पोहोचविली आहे. तो बेशुद्ध झाल्यानंतर मृत झाल्याचे समजून नग्नावस्थेत त्यास पश्चिम पांढरेवाडी ते कोकणे वस्ती रस्त्यालगत फेकून दिले.
मारहाण प्रेमप्रकरणातून झाल्याची चर्चा
आरोपींनी इतक्या क्रूरतेने माउली गिरी यास मारहाण का केली, याचा उलगडा अद्याप करण्यात आला नाही. तक्रारीतही त्याच्या वडिलांनी कारणाचा खुलासा केलेला नाही. असे असले तरी ही मारहाण प्रेमप्रकरणातून झाली असल्याची चर्चा होत आहे.