पाच हजार हेक्टरवरील पिके धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:21 IST2021-07-19T04:21:15+5:302021-07-19T04:21:15+5:30
बाबू खामकर पाथरूड : भूम तालुक्यातील पाथरूड परिसरातील खरीप हंगामातील जोमात आलेल्या पिकांवर सततच्या ढगाळ वातावरणाने मोठ्या प्रमाणात ...

पाच हजार हेक्टरवरील पिके धोक्यात
बाबू खामकर
पाथरूड : भूम तालुक्यातील पाथरूड परिसरातील खरीप हंगामातील जोमात आलेल्या पिकांवर सततच्या ढगाळ वातावरणाने मोठ्या प्रमाणात कीडरोंगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने परिसरातील जवळपास पाच हजार हेक्टरवरील प्रामुख्याने सोयाबीन व उडीद ही महत्त्वाची पिके सध्या संकटात सापडली आहेत. विविध कीडरोगाने प्रादुर्भावग्रस्त झालेली ही पिके वाचवण्यासाठी शेतकरी फवारणीच्या धावपळीत दिसून येत आहेत.
पाथरूड परिसर हा अंभी महसूल मंडळात येतो. वेळेवर पाऊस पडल्याने पाथरूड परिसरात यावर्षी हजारो हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी झाली असून, यामध्ये सोयाबीन व उडदाचे क्षेत्र सर्वाधिक आहे. त्याखालोखाल मूग, तूर, मका या पिकांची पेरणी झाली आहे. पेरणीपासून परिसरात चांगला पाऊस पडत असल्याने पिके जोमात आली आहेत; परंतु गेल्या आठवडाभर सततच्या हवामान बदलामुळे व सतत ढगाळ वातावरण राहिल्याने परिसरातील जवळपास पाच हजार हेक्टरवरील पिकांवर विविध रोगाने हल्ला चढविला आहे. यावर वेळीच उपाययोजना न झाल्यास मोठ्या प्रमाणात उत्पादनात घट येण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत.
खरीप हंगामातील महत्त्वाचे पीक असलेल्या उडदावर प्रामुख्याने मावा, करपा अळी यासह कोडकीडा अशा घातक रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. तसेच सोयाबीनवरही मोठ्या प्रमाणावर पाने खणाऱ्या अळ्यांसह विविध रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने पाथरूड परिसरातील जवळपास पाच हजार हेक्टरवरील पिके सध्या प्रादुर्भाव ग्रस्त झाल्याने शेतकरी महागडी औषधे घेऊन दिवसभर फवारणीच्या कामाला लागले आहेत; परंतु नेमके कोणते औषध कोणत्या रोगावर फवारायचे, हे अनेक शेतकऱ्यांना माहिती नाही. त्यामुळे दुकानदार सांगतील तेच महागडे औषध शेतकऱ्यांना फवारावे लागत आहे. यामुळे उत्पादन खर्चात वाढ झाली आहे.
खोडकिड्यामुळे संपूर्ण झाड जातेय वाळून
उडीदावर सध्या पाने खाणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव असून, ही अळी पानांना छिंद्रे पाडत असून पानांमधील रस शोषून घेत असल्याने वेळीच उपाय नाही झाल्यास उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येते. या पिकावर मावा रोगही असल्याने यामुळे वाढ खुंटत आहे. खोडकिडा या घातक रोगाचाही प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने यामुळे शेंड्यापासून खोडापर्यंत संपूर्ण झाड वाळून जात आहे. खोडकिडा या रोगामुळे तर अनेकांना उडीद पिकांवर नांगर फिरवावा लागला आहे. उडदावर करप्याचाही प्रादुर्भाव असून, यामुळे पानावर लाल ठिपके पडून पाने जळत आहेत. याशिवाय सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणात पाने गुंडाळणारी व पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव असल्याने वेळीच उपाययोजना न झाल्यास मोठे नुकसान होऊ शकते.
कोट...
किडींसाठी पोषक हवामान झाल्याने उडीद, सोयाबीन पिकावर अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. याच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी क्विनॉलफॉस (२५ ईसी) ३० मिली किंवा फ्ल्युबेंडामाइड (२० टक्के डब्लू.जी.) ६ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी प्रमाणात फवारणी करावी.
- निखिल रायकर, मंडळ कृषी अधिकारी, ईट