तीन मंडळात पिकाचे नमुना सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:37 IST2021-08-25T04:37:29+5:302021-08-25T04:37:29+5:30
लोहारा : तालुक्यात यंदा पावसाने खंड दिल्यामुळे खरीप हंगामाच्या सरासरी उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. या अनुषंगाने कृषी ...

तीन मंडळात पिकाचे नमुना सर्वेक्षण
लोहारा : तालुक्यात यंदा पावसाने खंड दिल्यामुळे खरीप हंगामाच्या सरासरी उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. या अनुषंगाने कृषी विभागाच्या वतीने तालुक्यातील तीन मंडळात नुकतेच पिकाचे नमुना सर्वेक्षण देखील झाले आहे. परंतु, तालुका कृषी कार्यालयाकडून अहवाल काय सादर केला आहे. यावर नुकसान भरपाईच्या २५ टक्के रक्कम शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीकडून आगाऊ मिळणार का नाही, हे ठरणार आहे.
प्रतिकूल हवामान घटकांमुळे निर्माण झालेल्या नुकसानी संदर्भात कृषी आयुक्तांच्या आदेशानुसार लोहारा तालुक्यातील माकणी, जेवळी व लोहारा या तीन महसूल मंडळातील लोहारा, भोसगा, एकोंडी (लो), मार्डी, वडगाव, जेवळी, कास्ती या गावांमध्ये नमुना सर्वेक्षण करण्यात आले. तालुका कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी, विमा प्रतिनिधी यांच्या संयुक्त टीमने हे सर्वेक्षण करून सरासरी उत्पन्नाच्या किती टक्के नुकसान झाले, याचा अहवाल जिल्हा कृषी अधिकारी यांना दिला आहे. प्रतिकूल हवामान घटकामुळे सरासरी उत्पन्नाच्या ५० टक्के नुकसान होत असल्यास नुकसान भरपाईच्या २५ टक्के रक्कम शेतकऱ्यांना आगाऊ देण्यात यावी, अशी तरतूद आहे. त्यानुसार २८ जुलै रोजी कृषी आयुक्तांनी या सर्वेक्षणाचे आदेश दिले होते.
लोहारा तालुक्यातील ५२ हजार ४४९ शेतकऱ्यांनी सोयाबीन, उडीद, मूग, तूर, बाजरी या पिकाचा विमा भरून ३८ हजार ३६५ हेक्टरवरील पिके संरक्षित केली आहेत. यासाठी शेतकऱ्यांनी पीक विम्याच्या हप्त्यापोटी विमा कंपनीकडे ३ कोटी ६ लाख रुपये विमा हप्ता भरला आहे. तसेच शासन हिस्सा ४५ कोटी ६७ लाख रुपये विमा कंपनीकडे जमा होणार आहे. म्हणजेच, तालुक्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा हप्त्यापोटी विमा कंपनीकडे एकूण ४८ कोटी ७३ लाख रुपये जमा होणार आहेत. पावसाने सलग २१ दिवस खंड दिल्यामुळे अपेक्षित उत्पन्न यावर्षी निघणार नाही. त्यात उत्पन्नात घट येणार आहे. त्यामुळे हे नमुना सर्वेक्षण करण्यात आले.
कोट......
गेल्या वर्षीच्या पीक विम्यासाठी उच्च न्यायालयात अजूनही संघर्ष सुरू आहे. आता पुन्हा प्रतिकूल हवामान घटकांमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत कृषी विभागाच्या अहवालानुसार तातडीने तालुक्यातील शेतकऱ्यांना २५ टक्के रक्कम आगाऊ देण्यात यावी अन्यथा संघर्ष अटळ आहे.
- अनिल जगताप, माजी जिल्हा उपाध्यक्ष, रायुकाँ
यावर्षी सुरुवातीला पाऊस चांगला झाला. त्यामुळे पिके जोमात आली. परंतु, प्रत्यक्षात सोयाबीनला फुले लागत असताना पाऊस गायब झाला आणि फुले गळाली. त्यामुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उत्पन्नातही ६० ते ७० टक्के घट येणार असल्याचे चित्र आहे.
- केशव पाटील, शेतकरी, खेड
तालुकास्तरीय संयुक्त समितीमार्फत पावसातील खंडामुळे झालेल्या उत्पादनामध्ये येणारी लक्षणीय घट आणि नुकसानीचे रँडम सर्वेक्षण करून अहवाल वरिष्ठ कार्यालयात पाठविण्यात आला आहे.
- मिलिंद बिडबाग, तालुका कृषी अधिकारी