कोरोना तपासणी निष्कर्ष रुग्णांपर्यंत पोहोचेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:21 IST2021-07-19T04:21:39+5:302021-07-19T04:21:39+5:30
जेवळी : लोहारा तालुक्यातील जेवळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना टेस्ट केलेल्या रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह येऊनही याची माहिती त्यांच्यापर्यंत ...

कोरोना तपासणी निष्कर्ष रुग्णांपर्यंत पोहोचेना
जेवळी : लोहारा तालुक्यातील जेवळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना टेस्ट केलेल्या रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह येऊनही याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामुळे नागरिकांत चिंता व्यक्त होत आहे.
लोहारा तालुक्यातील जेवळी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १४ गावांचा समावेश आहे. सध्या दक्षिण जेवळी गावात दररोज सर्दी, ताप, खोकला असलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. हे रुग्ण कोरोनाची चाचणी करण्यासाठी जेवळी प्राथमिक आरोग्य केंद्रात जात आहेत. येथील आरोग्य केंद्रात दररोज कोरोनाची प्रथम अँटिजेन टेस्ट केली जाते. यात रुग्ण पॉझिटिव्ह असल्यास पुढील उपचारासाठी लोहारा येथे पाठवण्यात येते. परंतु, जर अहवाल निगेटिव्ह असेल तर त्या रुग्णांची आरटीपीसीआर तपासणी केली जाते. याचे अहवाल दुसऱ्या दिवशी येणे अपेक्षित आहे. तसेच ‘अहवाल पॉझिटिव्ह आल्यास तुम्हाला कळविले जाईल. फोन नाही आल्यास तुम्ही निगेटिव्ह आहात, असे समजायचे’, असा संदेश रुग्णांना दिला जातो. त्यामुळे फोन नाही आल्यास रुग्ण बिनधास्त राहतात.
दरम्यान, दक्षिण जेवळी येथील एका शेतकऱ्याने १२ जुलै रोजी स्वॅब तपासणीसाठी दिला होता. याचा रिपोर्ट दुसऱ्या दिवशी १३ जुलै रोजी आलेला असतानाही आरोग्य प्रशासनाकडून त्या रुग्णास याची माहिती देण्यात आली नाही. यानंतर शनिवारी गावात लसीकरण असल्याने दुसरा डोस घेण्यासाठी ते आरोग्य केंद्रात गेले. यावेळी त्यांना ‘तुमचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे तुम्हाला डोस घेता येणार नाही’, असे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह असतानाही हे रुग्ण तीन दिवस गावात फिरत होते. प्रस्तुत प्रतिनिधीने अन्य एका कोरोनाबाधित रुग्णाशी संपर्क साधला असता त्यांनीही ‘आम्हाला आरोग्य विभागाकडून फोन आला नाही. परंतु, आम्हीच काळजीपोटी स्वत:हून चौकशी केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे समजले’, असे त्यांनी सांगितले. एकूणच कोरोनासारख्या महामारीचा मुकाबला करण्याच्या कामातही आरोग्य विभागात सुसूत्रता नसल्याचे यावरून दिसून येत आहे.
180721\1511-img-20210718-wa0011.jpg
जेवळी प्राथमिक आरोग्य केंद्र फोटो
कोरोना पाँजिटीव्ह रूग्णांना माहिती मिळेना