उमरग्यात धारदार शस्त्राच्या हल्ल्यात बांधकाम गुत्तेदार गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 19:05 IST2025-04-15T19:05:16+5:302025-04-15T19:05:43+5:30
प्रकृती चिंताजनक असल्याने अधिक उपचारासाठी सोलापूर येथे रवाना करण्यात आले.

उमरग्यात धारदार शस्त्राच्या हल्ल्यात बांधकाम गुत्तेदार गंभीर जखमी
उमरगा (धाराशिव) : उमरगा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाढती गुन्हेगारी चिंतेचा विषय बनला असून भरदिवसा घातक शस्त्राने हल्ल्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. मंगळवारी ( दि. १५) भरदिवसा एका बांधकाम व्यावसायिकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने उमरगा शहर हादरले आहे.
मिळालेली माहिती अशी की, बांधकाम गुत्तेदार गोविंद दंडगुले हे आज दुपारी शहरातील कळस तांब्या चौकात थांबले होते. यावेळी तिथे एका कारमधून तीन ते चार अज्ञात व्यक्ती उतरल्या. त्यांनी अचानक दंडगुले यांचेवर धारदार शस्त्राने हल्ला चढवला. त्यानंतर हल्लेखोर तेथून पसार झाले. हल्ल्यात दंडगुले गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. नागरिकांनी त्यांना जवळच्या दवाखान्यात दाखल केले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने अधिक उपचारासाठी त्यांना सोलापूर येथे रवाना करण्यात आले.
दरम्यान, माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिस पुढील तपास करत असून हल्लेखोर आणि हल्ल्याचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. मात्र, शहरवासीयांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. तर वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यात पोलिसांना पुरते अपयश आल्याची शहरात चर्चा असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजगी व्यक्त केली जात आहे.