वीज उपकेंद्राचा कारभार प्रभारींवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:35 IST2021-08-19T04:35:40+5:302021-08-19T04:35:40+5:30
या उपकेंद्रांतर्गत सोनारी व डोंजा या दोन उपकेंद्रांसाठी कनिष्ठ अभियंतापद कार्यान्वित आहे. या पदावर कार्यरत असलेल्या सलगर यांची सहा ...

वीज उपकेंद्राचा कारभार प्रभारींवर
या उपकेंद्रांतर्गत सोनारी व डोंजा या दोन उपकेंद्रांसाठी कनिष्ठ अभियंतापद कार्यान्वित आहे. या पदावर कार्यरत असलेल्या सलगर यांची सहा वर्षांपूर्वी बदली झाली. यानंतर २०१६ पासून २०१८ पर्यंत येथील प्रभारी पदभार सिद्धिकी यांच्याकडे देण्यात आला होता. सप्टेंबर २०१९ पासून एस. जे. नायर यांच्याकडे हा पदभार सोपविण्यात आला. मात्र, पद अद्यापही भरण्यात आले नाही. नायर यांच्याकडे परंडा येथील उपविभागीय कार्यालयातील कार्यालयीन कनिष्ठ अभियंतापदाचीही जबाबदारी आहे. त्यामुळे ते सोनारी व डोंजा येथे अपेक्षित वेळ देऊ शकत नाहीत. परिणामी दोन उपकेंद्रांतर्गत असलेल्या बारा गावांतील विजेसंदर्भातील अनेक प्रश्न रेंगाळत आहेत.
कर्मचाऱ्यांचीही पदे रिक्त
सोनारी व डोंजा या दोन्ही ३३ केव्ही उपकेंद्रांतर्गत घरगुती व कृषी असे हजारो ग्राहक आहेत. बंगाळवाडी, रोहकल, कुंभेफळ, साकत तलाव, सिना कोळेगाव धरण व डोमगाव या गावापर्यंत येथील विद्युत लाइन विस्तारलेली आहे. परंतु, त्या तुलनेत कर्मचारी संख्या तोकडी आहे. एकेका विद्युत कर्मचाऱ्याकडे पाच ते सहा गावांचा भार असल्याने वेळेवर बिघाड दुरुस्त न झाल्यास ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. थोडासा पाऊस झाला तरी कुठे ना कुठे बिघाड होऊन वीज गायब होते. अशावेळी मनुष्यबळ कमी असल्याने बिघाड दुरुस्त होण्यास विलंब लागत आहे.