तक्रार मागे घेण्यासाठी तहसीलदारास ब्लॅकमेल; मंडळ अधिकाऱ्यावर तुळजापुरात गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 11:44 IST2025-12-11T11:44:23+5:302025-12-11T11:44:32+5:30
दोघांविरुद्धही गुन्हे दाखल झाल्याने महसूल विभागातील नवा वाद चव्हाट्यावर आला.

तक्रार मागे घेण्यासाठी तहसीलदारास ब्लॅकमेल; मंडळ अधिकाऱ्यावर तुळजापुरात गुन्हा
धाराशिव : तुळजापुरातील तहसीलदार व मंडळ अधिकाऱ्यात पेटलेला वाद थेट आता खंडणीपर्यंत येऊन पोहोचला आहे. मंडळ अधिकाऱ्यानेे तहसीलदारांनी शिवीगाळ केल्याचा गुन्हा नोंद करताच तहसीलदारांनीही मंडळ अधिकाऱ्याने खंडणी मागितल्याची तक्रार दिली. यावरून दोघांविरुद्धही गुन्हे दाखल झाल्याने महसूल विभागातील नवा वाद चव्हाट्यावर आला.
तुळजापूर तालुक्यातील आरळी बु. येथील मंडळ अधिकारी दिनेश बहिरमल यांनी तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी आपल्यास अर्वाच्य शिवीगाळ केल्याची तक्रार धाराशिवच्या आनंदनगर ठाण्यात दिली होती. हे प्रकरण चौकशीवर ठेवण्यात आले होते. दरम्यान, यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली आहे. या दोघांतील वाद चिघळत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी मंडळ अधिकाऱ्याची उचलबांगडी करीत जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू होण्याचे आदेश काढले. यानंतर हे प्रकरण आणखीच चिघळत गेले आहे.
आता तहसीलदार अरविंद बोळंगे यांनीही ९ डिसेंबर रोजी तुळजापूर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार मंडळ अधिकारी दिनेश बहिरमल व बालाजी बोडके या दोघांनी आपणास खंडणी मागितल्याचे म्हटले आहे. दिनेश बहिरमल यांनी आनंदनगर ठाण्यात बोळंगे यांच्याविरोधात दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी या दोघांनी ६ डिसेंबर रोजी दुपारी सुरुवातीला १५ लाख रुपयांची खंडणी मागितली. यानंतर १० लाख रुपये व फोनवरुन २ लाख रुपये मागितले, असे तहसीलदार बोळंगे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार तुळजापूर पोलिसांनी मंडळ अधिकारी दिनेश बहिरमल व बालाजी बोडके या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.