BJP Suresh Dhas: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी राज्यातील इतर जिल्ह्यांनंतर आज धाराशिव इथं आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चातून भाजप आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. "परळीत अत्यंत चुकीच्या पद्धतीने काम सुरू आहे. पाकिस्तानसोबत तस्करी करणाऱ्या आरोपींसोबत धनंजय मुंडेंचे फोटो आहेत. सारंगी महाजन यांनीही जमिनीबाबत केलेला आरोप तुम्ही ऐकला असेल. एवढं सगळं होऊनही अजितदादा म्हणतात धनंजय मुंडेंचा दुरान्वयेही संबंध नाही. अजितदादा याला आता मंत्रिमंडळातून काढून टाका," अशा शब्दांत सुरेश धस यांनी आपली भूमिका मांडली आहे.
अजित पवारांना आवाहन करताना सुरेश धस म्हणाले की, "सुनेत्रा वहिनींच्या गावातून बोलतो मी दादा... सुनेत्रा ताई या आमच्या भगिनी आहेत... तुम्ही आमचे जावई आहेत...विनंती आहे तुम्हाला, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा. त्याच्या जागेवर सिंदखेडराजा मतदारसंघातून तुमच्या तिकिटावर निवडून आलेल्या कायंदेला मंत्रिपद द्या. माँ जिजाऊंच्या सिंदखेडराजाच्या आमदाराला मंत्रिपद द्या, नाही तर अन्य कोणाला द्या. पण याला काढा मंत्रिमंडळातून. याने आमचं लय वाटोळं केलंय. हा माणसं मारायला लागलाय. दुपारचाच माणूस मारला आमचा. पुन्हा याला सत्तेत ठेवला तर हा दिवस उगवताच माणसं मारायला सुरू करेल. एकट्या वाल्मीक कराडला कशाला दोष देता? वाल्मीकच्या मागे कोण उभाय ते पण बघितलं पाहिजे आणि हे म्हणतात हत्या प्रकरणात माझा काय संबंध. असं कसं?" असा सवाल आमदार धस यांनी विचारला आहे.
दरम्यान, "हत्या प्रकरणातील सात आरोपींवर आता मकोका कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यातील आठवा आरोपी हा वाल्मीक कराड आहे आणि तोही लवकरच मकोका गुन्ह्यात येईल," असा दावाही आमदार सुरेश धस यांनी केला आहे.