बर्ड फ्लूच्या संकटाने पोल्ट्री उद्योगावर ‘संक्रात’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:26 IST2021-01-13T05:26:14+5:302021-01-13T05:26:14+5:30
(फोटो - बालाजी आडसूळ १२) बालाजी आडसूळ कळंब : शिकून नोकरी लागत नसल्याने पोल्ट्री उद्योगात स्थिरस्थावर होत असलेल्या तरुणावर ...

बर्ड फ्लूच्या संकटाने पोल्ट्री उद्योगावर ‘संक्रात’
(फोटो - बालाजी आडसूळ १२)
बालाजी आडसूळ
कळंब : शिकून नोकरी लागत नसल्याने पोल्ट्री उद्योगात स्थिरस्थावर होत असलेल्या तरुणावर बर्ड फ्लू चर्चेने पुन्हा ‘संक्रांत’ आणली आहे. हा व्यवसाय कोरोनाच्या गर्तेतून कसाबसा बाहेर पडत होता. मात्र, आता तीनच दिवसांत जिवंत पक्ष्यांचे दर निम्म्याने, तर अंड्याचे दर दोन रुपयांनी घसरले आहेत.
वाढत्या लोकसंख्येने जमीनधारणा कमी होत आहे. यातच शिक्षण घेऊन नोकरीचाही पत्ता नसतो. यास्थितीत अनेक तरुणांची पावले शेतीपूरक उद्योगाकडे वळली आहेत. यातूनच तालुक्यातील अनेक कुटुंबांना पोल्ट्री व्यवसायाने नवे बळ मिळाले आहे; परंतु हा व्यवसायही आता जास्त जोखीमस्तर असलेला ठरत आहे. खाद्यांचे वाढते दर, दरातील चढ-उतार व रोग आणि साथीचे संकट पोल्ट्रीला वारंवार संकटात ढकलत आले आहे. यंदाही एप्रिल ते ऑक्टोबर हा लॉकडाऊन ते अनलॉक यादरम्यानचा काळ मोठा आतबट्ट्याचा ठरला. यातून पोल्ट्रीचालक कसेबसे सावरत होते, तोच आता या व्यवसायावर बर्ड फ्लूचे संकट घोंगावत आहे. स्थानिक पातळीवर बर्ड फ्लूची एकही पॉझिटिव्ह केस नसली तरी बाहेरच्या जिल्ह्यात यासंदर्भातील प्रकरणे अन् याची चालविली जाणारी चर्चा मात्र तालुक्यातील पोल्ट्री व्यवसायाच्या मुळावर आल्याचे दिसून येत आहे. यातून दरदिवशी व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान मात्र होत आहे.
(चौकट)
तालुक्यात शंभरावर पोल्ट्री
तालुक्यात मांसल पक्षी संगोपनाचे नोंदणीकृत ८४ शेड, तर अंडी उत्पादनाचे २० शेड आहेत. याशिवाय पशुसंवर्धनच्या ‘नोंदी’त नसलेले अनेक व्यवसाय आहेत. ३ हजार ते १० हजार पक्ष्यांची संगोपन क्षमता असलेल्या या पोल्ट्री शेडमध्ये २ लाखांवर पक्षी आहेत. यात इटकूर, येरमाळा भाग ‘पोल्ट्री बेल्ट’ समजला जातो.
दररोज १ लाख अंडी उत्पादन
तालुक्यात दररोज १ लाख अंडी उत्पादन होते. यासाठी मोठी भांडवली गुंतवणूक झाली आहे. दररोज एक अंडे देेणाऱ्या या पक्ष्याला केवळ खाद्यासाठी ३ रुपयांचा खर्च करावा लागतो. मात्र, बर्ड फ्लूच्या चर्चेने अंड्याचे दर उतरल्याने वरील अर्थकारण तोट्यात आले आहे. चार दिवसांपूर्वी ठोक स्वरूपात ५ रुपयांना जाणारे अंडे तीन रुपयांवर आले आहे. मांसल पक्ष्यांतील गावरान तीनशेचे दोनशे, बॉयलर दोनशेचे शंभर, तर जिवंतचा साठ-सत्तर रुपये किलो झाला आहे.
पशुसंवर्धन विभाग ॲक्शन मोडवर
बर्ड फ्लूच्या धर्तीवर येरमाळा, खामसवाडी, दहिफळ, शिराढोण, इटकूर, आंदोरा, कोथळा, निपाणी, चोराखळी, सातेफळ व कळंब येथील पशुसंवर्धन दवाखान्याची यंत्रणा सतर्क झाली आहे. शेड, त्यांचे पक्षी याची स्पॉट पाहणी सुरू करण्यात आली आहे. आजार आहे का? संख्या किती आहे? खाद्य किती दिवस पुरेल, याची माहिती घेतली जात आहे.
कोंबडे, पारवे, कावळे अन्...
पशुसंवर्धन विभागाचे कर्मचारी पक्षी वर्गातील कोंबड्यांचीच नव्हे, तर बगळे, कावळे, बदक, पारवे आदी पक्ष्यांचीदेखील ‘मरतुक’ (मोरटॅलिटी) आहे का याची पाहणी करून लक्ष ठेवून आहेत, असे पशुधनविकास अधिकारी डॉ. विजय देशमुख यांनी सांगितले.
नुसत्या चर्चेने ‘मार डाला’
अजून तालुक्यात एकही केस नाही. तशी लक्षणेही नाहीत. मात्र, माध्यमातील चर्चा सुशिक्षित बेकारांनी कष्ट करत, कर्ज काढून उभारलेला व्यवसाय धोक्यात सापडला आहे. यामुळे बर्ड फ्लूच्या साथीपेक्षा घडवून आणलेला चर्चा व्यवसायास मारक ठरत आहे.