'प्रेमात धोका', स्टेटस ठेवले म्हणून प्रेयसीच्या पतीकडून तरुणाचे अपहरण, केली जबर मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 17:35 IST2025-07-17T17:27:26+5:302025-07-17T17:35:01+5:30
येथून पुढे तिचे नाव घेतल्यास जिवे मारण्याची दिली धमकी

'प्रेमात धोका', स्टेटस ठेवले म्हणून प्रेयसीच्या पतीकडून तरुणाचे अपहरण, केली जबर मारहाण
तुळजापूर (जि. धाराशिव) : प्रेयसीने प्रेमात धोका दिल्याने तशा मजकुराचे स्टेटस समाजमाध्यमावर ठेवल्याने प्रेयसीच्या कथित पतीने व त्याच्या दोन मित्रांनी सांगवी मार्डी येथील एका तरुणास बेदम मारहाण करुन जखमी केले. ही घटना सुरतगावजवळील तलावालगत घडली असून, याप्रकरणी तुळजापूर ठाण्यात तिघांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हे संपूर्ण प्रकरण मंगळवारी बाहेर आले.
तुळजापूर तालुक्यातील सांगवी मार्डी येथील योगेश हरी काळे (३०) हा व्यवसायाने ट्रकचालक आहे. तो गडसंवर्धन मोहिमेतही सातत्याने सहभागी असतो. दोन वर्षांपूर्वी अशाच एका गड संवर्धन मोहिमेवर असताना डोंबिवलीतील एका तरुणीशी योगेशची ओळख झाली. त्यातून प्रेम बहरले. दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेत साखरपुडाही उरकला. यानंतर ते एकमेकांसोबतच राहात होते. चार महिन्यांपूर्वी योगेशची ही प्रेयसी अचानक घरातून निघून गेली. तिने योगेशचा त्याच्याच सांगवी मार्डी गावातील मित्र असलेल्या रोहित बागलसोबत लग्न केल्याचे तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे. ही बाब योगेशला कळल्यानंतर त्याने काही दिवसांपूर्वीच तिने धोका दिला, असे स्टेटस ठेवले होते. हे निदर्शनास आल्यानंतर रोहित बागल याने त्याचा मित्र चेतन माने (रा. काक्रंबा), सत्यवान चादरे (रा. तुळजापूर) यांना सोबत घेऊन योगेशला स्टेटस का ठेवले, अशी विचारणा करीत कारमध्ये जबरीने बसवून त्यास सुरतगाव तलावालगत उतरवून बेल्ट, काठीने जबर मारहाण करीत जखमी केले. याप्रकरणी योगेश काळे याच्या तक्रारीवरून तुळजापूर ठाण्यात तिघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अद्याप पसार आहेत.
येथून पुढे तिचे नाव घेतल्यास जिवे मारू
जखमी योगेश यास त्याचा मित्र राहिलेल्या आरोपी रोहित बागल याने मारहाण केल्यानंतर येथून पुढे तिचे नावही घेतले तर तुला जिवे मारू, अशी धमकी दिल्याचे तक्रारी म्हटले आहे. आपल्या जिवाला त्याच्यापासून धोका असल्याचेही त्यानेे जबाबामध्ये नमूद केले आहे.