बंडखोरीनंतर शिंदे गटानं प्रथमच उघडलं खातं, शिवसेना खासदाराच्या मतदारसंघात विजय
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 16:31 IST2022-08-05T16:29:03+5:302022-08-05T16:31:51+5:30
आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या नेतृत्वाखाली उमरगा तालुक्यातील शिवसेनेनं या निवडणुकीत विजयी मिळवला आहे

बंडखोरीनंतर शिंदे गटानं प्रथमच उघडलं खातं, शिवसेना खासदाराच्या मतदारसंघात विजय
उस्मानाबाद/मुंबई - राज्यातील अनेक जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. राज्यातील राजकीय घडामोडी आणि बदलामुळे या निवडणुकांनाही अतिशय महत्त्व आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील चिंचपूरची ग्रामपंचायत शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने जिंकल्यानंतर आता उस्मानाबाद जिल्ह्यात शिंदे गटाने खाते उघडले आहे. जिल्ह्याच्या उमरगा-लोहारा तालुक्यात 2022 च्या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटाचा भगवा फडकला आहे.
आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या नेतृत्वाखाली उमरगा तालुक्यातील शिवसेनेनं या निवडणुकीत विजयी मिळवला आहे. विशेष म्हणजे आमदार चौगुले हे सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटासमेवत आहेत. तर, उमरगा हा मतदारसंघ उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात येतो. येथून शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर हे खासदार आहेत. ते सध्या उद्धव ठाकरे यांच्यासमवेत आहेत.
विजयी उमेदवार (शिंदे गट) खालील प्रमाणे.
उमरगा
कसगी - 13 पैकी 12
तुगाव - 13 पैकी 11
कोरेगाववाडी - 08 पैकी 05
म्हणजेच उमरगा तालुक्यात शिंदे गटाचे एकूण 34 उमेदवार विजयी झाले आहेत. येथील 3 ग्रामपंचायतींवर त्यांचे वर्चस्व आहे.
लोहारा तालुका :-
खेड - 11 पैकी 06.
येथील शिंदे गटाचे 11 उमेदवार विजयी झाले असून एकहाती सत्ता ग्रामपंचायतीवर मिळविण्यात यश आलं आहे.
शिरसाट यांच्या मतदारसंघाकडेही लक्ष
दरम्यान, बंडखोर आमदार संजय शिरसाट यांच्या मतदारसंघातील निवडणुकांकडेही राज्याचे लक्ष लागलं आहे. वडगाव-बजाजनगर या ग्रामपंचायतीसाठी निवडणुकीसाठी आज सकाळपासून (दि.५) मतमोजणी सुरु आहे. या निवडणुकीत बंडखोर आ.संजय शिरसाट यांच्या पॅनेलची विजयी घोडदौड पाहायला मिळत आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत घोषित 14 पैकी 8 जागा आ. शिरसाट गटाने जिंकल्या आहेत. येथे 17 जागांसाठी 72 उमेदवार रिंगणात आहेत. मात्र, येथे शिरसाट यांचेच पारडे जड असल्याचं दिसून येते.
सोलापुरात भाजपच्या सत्तेला खिंडार
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ग्रामदैवत अमोगसिद्ध बहुजन ग्रामविकास पॅनल बहुमताने विजयी झाला आहे. येथील ग्रामपंचायतीवर ग्रामदैवत अमोगसिद्ध बहुजन ग्रामविकास पॅनलच्या 6 पैकी 5 उमेदवारांनी बाजी मारली. विशेष म्हणजे गेल्या 15 वर्षांपासून येथील ग्रामपंयतीवर भाजपच्या नेतृत्वातील गटाची सत्ता होती. त्यामुळे, 15 वर्षांपासूनच्या भाजपच्या सत्तेला येथे खिंडार पडल्याचं दिसून येते आहे. भाजपाचे माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या पॅनलला येथे केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले.