आली हो आली... अतिवृष्टीची मदत आली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:45 IST2021-01-08T05:45:29+5:302021-01-08T05:45:29+5:30
उस्मानाबाद : जिल्ह्यात ऑक्टोबरच्या मध्यात झालेल्या अतिवृष्टीने शेती व पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्याची भरपाई म्हणून राज्य आपत्ती ...

आली हो आली... अतिवृष्टीची मदत आली
उस्मानाबाद : जिल्ह्यात ऑक्टोबरच्या मध्यात झालेल्या अतिवृष्टीने शेती व पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्याची भरपाई म्हणून राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून दुसऱ्या टप्प्यातील मदत गुरुवारी जाहीर करून ती लागलीच जिल्ह्यांना वितरित करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांतच दुसऱ्या टप्प्यातील १३३ कोटी रुपये शेतकऱ्यांना वर्ग होतील.
उस्मानाबाद जिल्ह्यातील अतिवृष्टीत ४ लाखांवर शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. पिकांच्या नुकसानीपोटी २६७ कोटी ५७ लाख रुपयांची मागणी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली होती. त्यातील दिवाळीपूर्वी आलेल्या आलेल्या पहिल्या टप्प्यात १३३ कोटी ६५ लाख रुपये बाधित शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले आहेत. दरम्यान, दुसऱ्या टप्प्यातील मदतीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून होते. हा टप्पाही गुरुवारी शासनाने जाहीर केला आहे. यामध्ये यापूर्वीच जाहीर केल्याप्रमाणे जिरायती पिकांसाठी नियमांनुसार प्रतिहेक्टरी मिळणाऱ्या ६ हजार ८०० रुपयांत शासनाने ३,२०० रुपयांची वाढ करून १० हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. प्रतिशेतकरी दोन हेक्टरच्या मर्यादेत ही मदत देण्यात येणार आहे, तर बहुवार्षिक फळपिकांसाठी प्रतिहेक्टरी १८ हजार रुपयांत ७ हजारांची वाढ करून २५ हजार रुपये देण्यात येत आहेत. यानुसार १३३ कोटी ६५ लाख रुपये जिल्ह्यास प्राप्त झाले. दुसऱ्या टप्प्यात राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे ९१ कोटी ४ लाख, तर शासन निधीतून वाढीव ४२ कोटी ६१ लाख रुपये याप्रमाणे उपरोक्त रक्कम वितरित केली जाणार आहे.
कोट...
शासनाकडून प्राप्त होणारा निधी लागलीच तहसीलस्तरावर वितरित केला जाणार आहे. तेथून तो शक्य तितक्या लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जाईल. यापूर्वी पहिल्या टप्प्यातील मदत वितरित करताना बाधित शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती अद्ययावत केलेली असल्याने वितरणासाठी फार वेळ लागणार नाही.
-शिवकुमार स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी