व्याजाने घेतलेल्या पैशांसाठी घरात घुसून बेदम मारहाण; तरुणाचा गेला जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 19:05 IST2025-08-14T18:59:27+5:302025-08-14T19:05:01+5:30
पत्नीच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध गुन्हा

व्याजाने घेतलेल्या पैशांसाठी घरात घुसून बेदम मारहाण; तरुणाचा गेला जीव
भूम : व्याजाने घेतलेल्या पैशांवरून झालेल्या मारहाणीत एकाचा खून झाल्याची घटना भूम तालुक्यातील सुकटा येथे उघडकीस आली. बालाजी जयराम भायगुडे (वय ३३) असे मयताचे नाव असून, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मयताच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून भूम पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.
भायगुडे हे ११ ऑगस्ट रोजी सकाळी त्यांच्या घरी झोपलेले असताना जोशी बबरू काळे, राधा जोशी काळे व तुषार जोशी काळे हे तिथे गेले. त्यांनी भायगुडे यांना घरातून बाहेर आणून पोटात, छातीत मारहाण केली, तसेच त्यांचे डोके सिमेंट रोडवर आदळले. यात भायगुडे हे गंभीर जखमी झाले. त्यांना धाराशिव येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून, तपास पोलिस निरीक्षक श्रीगणेश कानगुडे करीत आहेत.
दरम्यान, बालाजी भायगुडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती मिळताच धाराशिव येथील स्थानिक गुन्हे शाखेची टीम व भूम पोलिस ठाण्याचे एक पथक आरोपीस अटक करण्यासाठी रवाना झाले आहे. व्याजाने घेतलेले पैसे परत करण्याच्या कारणावरून दगडाने मारहाण करून खून केल्याची फिर्याद मयताची पत्नी सोनाली यांनी दिली आहे.