शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 09:03 IST2024-12-12T09:02:48+5:302024-12-12T09:03:15+5:30
या हल्ल्यात विजय माने गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना बार्शी येथील जगदाळे मामा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले

शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला
परांडा/धाराशिव : शेतातील पिकांना रात्री पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला. या घटनेत शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. ही घटना भूम तालुक्यातील मात्रेवाडी शिवारात घडली.
मात्रेवाडी येथील शेतकरी विजय सोमनाथ माने व त्यांचा भाऊ सागर सोमनाथ माने ( मेजर ) हे दोघे बुधवारी रात्री त्यांच्या शेतातील ( गट नं. १२७) पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. पिकाला पाणी सोडून दोघे एकाच ठिकाणी झोपले होते. काही वेळाने सागर माने उठून सऱ्यात सोडलेले पाणी कडेला गेले का नाही, ते बघण्यासाठी ५० ते ६० फूट अंतरापर्यंत गेले असता अचानक झोपलेल्या विजय सोमनाथ माने यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात विजय माने गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना बार्शी येथील जगदाळे मामा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.