आर्थिक देवाणघेवाणीचे गणित बिघडले; डोक्यात दगड घालून सहकारी शिक्षकाचा खून
By चेतनकुमार धनुरे | Updated: February 22, 2023 16:25 IST2023-02-22T16:25:05+5:302023-02-22T16:25:49+5:30
आर्थिक कारणावरुन वाद विकोपाला गेला अन अनिष्ठ झाले; उस्मानाबाद शहरातील घटना

आर्थिक देवाणघेवाणीचे गणित बिघडले; डोक्यात दगड घालून सहकारी शिक्षकाचा खून
उस्मानाबाद : शहरातील कुरणे नगर भागात राहणाऱ्या एका शिक्षकाचा आर्थिक देवाणघेवाणीतून सहकारी शिक्षकानेच डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बुधवारी गुन्हा दाखल करुन शहर पोलिसांनी पहाटेच आरोपी शिक्षकाला अटक केली.
उस्मानाबाद शहरातील भोसले हायस्कूलमध्ये श्याम देशमुख व धीरज हुंबे हे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. हे दोघेही कुरणे नगर भागात वास्तव्यास आहेत. सोमवारी सायंकाळी या दोघांमध्ये आर्थिक कारणावरुन वादावादी झाली. यानंतर धीरज हुंबे यांनी रागाच्या भरात देशमुख यांच्या डोक्यात दगड घातला. त्यामुळे ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळून पडले. हा प्रकार त्यांच्या मुलाला समजल्यानंतर त्याने घराकडे धाव घेत वडिलांचा श्वास सुरु असल्याने शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी उपचार सुरु करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. तपासणी करुन डॉक्टरांनी श्याम देशमुख यांना मयत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक उस्माना शेख यांच्या सूचनेनुसार शहर ठाणयाचे पथक घटनास्थळी रवाना झाले. मृत श्याम देशमुख यांच्या मुलाने दिलेल्या तक्रारीनुसार धीरज हुंबे यांच्यावर गुन्हा दाखल करीत तपासाची चक्रे गतीमान केली. पहाटे दोन वाजेच्या सुमारास आरोपी हुंबे यास पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, या घटनेमुळे उस्मानाबादच्या शैक्षणिक वर्तुळात बुधवारी एकच खळबळ उडाली आहे.