रागाच्या भरात महिलेने आधी दोन बालकांना पाण्यात बुडवलं, नंतर स्वतःही जीवन संपवलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 14:00 IST2024-12-05T14:00:10+5:302024-12-05T14:00:15+5:30
घटनेच्या दहा दिवसांनंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

रागाच्या भरात महिलेने आधी दोन बालकांना पाण्यात बुडवलं, नंतर स्वतःही जीवन संपवलं
धाराशिव : आपल्या पावणेदोन वर्षीय मुलीस व ४ महिन्यांच्या मुलाला घरातील पाण्याच्या बॅरलमध्ये बुडवून मातेने स्वत: गळफास घेतल्याची घटना घट्टेवाडी येथे २४ नोव्हेंबरला घडली. आकस्मिक मृत्यूची नोंद घेतल्यानंतर ३ डिसेंबर रोजी पतीने दिलेल्या तक्रारीवरून नळदुर्ग पोलिसांनी रात्री मयत महिलेवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
तुळजापूर तालुक्यातील घट्टेवाडी येथील गणेश सुनील घट्टे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार पत्नी राधिका घट्टे (२५) हिच्यासह ते घट्टेवाडी येथील घरात वास्तव्यास होते. त्यांना १ वर्ष ९ महिने वयाची श्रेया ही मुलगी व ४ वर्षे वयाचा श्रेयस मुलगा होता. सर्वजण एकत्र राहात असताना राधिका ही सतत चिडचिड करायची. ती रागीट व तापट स्वभावाची होती. घरातील कामांचा तसेच मुले सांभाळायचा त्रास होत होता. यामुळे रागाच्या भरात राधिका हिने तिच्या दोन्ही लेकरांना २४ नोव्हेंबर रोजी दुपारी घरातीलच बॅरलमधील पाण्यात बुडवून ठार मारले. यानंतर तिने स्वत:ही घरातच गळफास घेत जीवन संपवले.
हा प्रकार सायंकाळी साडेपाच वाजता उघडकीस आला. याप्रकरणी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, ३ नोव्हेंबर रोजी गणेश घट्टे यांनी नळदुर्ग ठाण्यात मयत पत्नीविरूद्ध खुनाची तक्रार दिली. दोन्ही लेकरांना बुडवून मारून स्वत: आत्महत्या केल्याची तक्रार दिल्याने पोलिसांनी तिच्यावर बीएनएस कलम १०३ (१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.