खेडमध्ये ४ कावळे मेले, मृतदेहासह पुण्याला नेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:26 IST2021-01-13T05:26:06+5:302021-01-13T05:26:06+5:30
उस्मानाबाद : लोहारा तालुक्यातील खेड येथे मंगळवारी चार कावळे मृतावस्थेत आढळून आले आहेत. बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने ...

खेडमध्ये ४ कावळे मेले, मृतदेहासह पुण्याला नेले
उस्मानाबाद : लोहारा तालुक्यातील खेड येथे मंगळवारी चार कावळे मृतावस्थेत आढळून आले आहेत. बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने या ठिकाणी तातडीने धाव घेऊन मृत कावळे ताब्यात घेत, त्यांच्या तपासणीसाठी लागलीच पुण्याला रवाना केले आहेत. दरम्यान, इतर पक्ष्यांमध्ये मात्र या आजाराची लक्षणे पथकाला आढळून आली नाहीत.
बर्ड फ्लूची साथ सुरू झाल्याने पक्ष्यांच्या मृत्यूकडे पशुसंवर्धन विभाग लक्ष ठेऊन आहे. मंगळवारी सकाळी लोहारा तालुक्यातील खेड गावाजवळील माकणी धरणाच्या लगत असलेल्या झाडीमध्ये असंख्य कावळ्यांचे वास्तव्य आहे. याच ठिकाणी चार कावळे मृतावस्थेत आढळून आले. ही माहिती पशुसंवर्धन विभागाला मिळताच, त्यांचे वैद्यकीय पथक खेडकडे रवाना झाले. दुपारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी सर्व काळजी घेत, मृत कावळ्यांना ताब्यात घेतले. त्यांचे मृतदेह तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेकडे तातडीने रवाना केले. यानंतर, पथकाने परिसरातील पक्ष्यांची, तसेच लगतच असणाऱ्या पोल्ट्रीमधील कोंबड्यांचीही पाहणी केली. मात्र, त्यांच्यात बर्ड फ्लू सदृश्य कोणतीही लक्षणे आढळून आली नसल्याचे पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.सुनील पसरटे यांनी सांगितले. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.नामदेव आघाव हेही उपस्थित होते. दरम्यान, खबरदारी म्हणून पक्ष्यांमध्ये मरकूतसारखी लक्षणे आढळून आल्यास, नागरिकांनी तातडीने याची माहिती नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेशी संपर्क करण्यास सूचित करण्यात आले आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता, जिल्ह्यातील कुक्कुट पालक शेतकरी, व्यावसायिकांनी अशी कोणतीही लक्षणे आपल्या पक्ष्यांमध्ये दिसल्यास तातडीने त्याची माहिती देण्याचे आवाहनही पसरटे यांनी दिली.