पारगाव गटातील ३४ किमी रस्त खड्ड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:26 IST2021-07-25T04:26:52+5:302021-07-25T04:26:52+5:30
पारगाव : वाशी तालुक्यातील पारगाव जिल्हा परिषद गटातील वेगवेगळ्या गावांना जोडणाऱ्या एकूण जवळपास ३४ किमी अंतराचे रस्ते खड्डेमय बनले ...

पारगाव गटातील ३४ किमी रस्त खड्ड्यात
पारगाव : वाशी तालुक्यातील पारगाव जिल्हा परिषद गटातील वेगवेगळ्या गावांना जोडणाऱ्या एकूण जवळपास ३४ किमी अंतराचे रस्ते खड्डेमय बनले आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असून, या रस्त्यावर चिखल व पाणी साचत असल्याने, वाहनधारकांना यातून वाट शोधताना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेष म्हणजे, मागील अनेक वर्षांपासून प्रशासन अथवा लोकप्रतिनिधींनीही याकडे लक्ष दिले नसल्याचा आरोप रहिवाशांमधून केला जात आहे.
वाशी तालुक्यातील पारगाव जिल्हा परिषद गटातील राज्य मार्ग ते बनगरवाडी पुढे घटपिंपरी हा सहा किमी, राज्य मार्ग ते दहिफळ ४ किमी, राज्य मार्ग ते शेलगाव ३ किमी, तसेच पारगाव ते गिरवलीमधला मार्ग ५ किमी, शेंडी फाटा ते शेंडी तीन किमी, पारगाव ते हातोला अर्धा रस्ता अडीच किमी, हातोला ते पांगरी दोन किमी, ब्रह्मगाव फाटा ते ब्रह्मगाव पाच किमी, राज्य मार्ग ते रुई ४ किमी असा जवळपास ३५ किमी अंतराच्या रस्त्याची सध्या दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहन चालकांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे.
पारगाव-गिरवली हा रस्ता ईटकडे जाण्यासाठी वाहन चालकांना सोईस्कर आहे. या रस्त्यामुळे वाहनचालकाना टोलचा भुर्दंड बसत नाही. मात्र, गेल्या दहा वर्षांपासून या रस्त्याची साधी डागडुजीही झालेली नाही. त्यामुळे सध्या या रस्त्यावरून दुचाकी चालविणेही कठीण झाले आहे. बांधकाम विभागाने या रस्त्याच्या बाबतीत तत्काळ लक्ष देऊन वाहन चालकाना रस्ता वापरण्यायोग्य करून देण्याबाबतचा ठराव पारगाव ग्रामपंचायत सदरील कार्यालयाला देणार आहे.
- कॉ.पंकज चव्हाण, उपसरपंच, पारगाव
वाशी तालुक्यातील घाटपिंपरी येथे सतत वर्दळ असते. मात्र, राज्य मार्ग ते घाटपिंपरी पर्यंतच्या रस्त्यावर खड्ड्यांचे प्रमाण अधिक असल्याने वाहन चालवणे जिकरीचे बनले आहे. अनेकदा रुग्णालाही वेळेत दवाखान्यात पोहोचविणे शक्य होत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात लोकप्रतिनिधी व संबंधित विभागातील अधिकारी यांनी लक्ष देऊन रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा.
- विनोद पाटील, ग्रा.पं. सदस्य, घटपिंपरी
राज्य मार्गापासून दहिफळ व शेलगावपर्यंत येणारे दोन्ही रस्ते पूर्णपणे उखडले गेलेले आहेत. या रस्त्यावरील डांबर पूर्णपणे निघून गेल्याने, रात्री अपरात्री काही घटना घडल्यास, राज्यमार्गावरून उस्मानाबाद किंवा बीडकडे जाण्यासाठी खूप वेळ लागतो. मागच्या २५ वर्षांत या रस्त्याचे काम झालेले नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या वतीने रस्त्याच्या दुरुस्तीबाबत ठराव देणार आहोत.
- सुनीता भैरट, सरपंच, दहिफळ
240721\img-20210720-wa0031.jpg~240721\img-20210719-wa0012.jpg~240721\img-20210719-wa0023.jpg
पारगाव गिरवली रस्त्याची बकाल अवस्था~दहिफल रस्ता~घटपिंपरी रस्ता