उस्मानाबाद जिल्ह्यात सहा तालुक्यातून चारा छावणीचे २५९ प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 18:51 IST2019-02-28T18:50:57+5:302019-02-28T18:51:29+5:30

प्रशासनाकडून अद्याप चारा छावण्यांना मंजुरी देण्यात आलेली नाही़

259 proposals of fodder camp in six talukas of Osmanabad district | उस्मानाबाद जिल्ह्यात सहा तालुक्यातून चारा छावणीचे २५९ प्रस्ताव

उस्मानाबाद जिल्ह्यात सहा तालुक्यातून चारा छावणीचे २५९ प्रस्ताव

उस्मानाबाद : दुष्काळाच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होत असून, पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनत चालला आहे़ उमरगा, लोहारा तालुका वगळता इतर सहा तालुक्यातून चारा छावणीचे तब्बल २५९ प्रस्ताव प्रशासनाकडे धडकले आहेत़ मात्र, प्रशासनाकडून अद्याप चारा छावण्यांना मंजुरी देण्यात आलेली नाही़

गतवर्षी अपुऱ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे हिवाळ्यातच जिल्ह्यातील पाणीटंचाईची तीव्रता जाणवू लागली़ सद्यस्थितीत प्रकल्प आटल्याने व गावा-गावातील जलस्त्रोताची पाणीपातळी खालावल्याने टंचाईत वाढ झाली आहे़ आता जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही दिवसेंदिवस गहन होत आहे़ पावसाअभावी खरीप, रबी हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेला़ परिणामी चाराही उपलब्ध होऊ शकला नाही़ माळराने ओस पडली असून, शेतशिवारातही चारा शिल्लक राहिलेला नाही़ अनेक पशुपालक जनावरांना वनक्षेत्रात नेत असली तरी तेथेही चारा उपलब्ध होताना दिसत नाही़ 
जिल्ह्यात लहान-मोठ्या पशुधनाची संख्या ७ लाख ३७ हजाराच्या घरात आहे. यामध्ये ४ लाख १२ हजार १४ मोठी जनावरे, १ लाख १३ हजार लहान जनावरे तर २ लाख ११ हजार ५४२ शेळ्या-मेंढ्या आहेत.

या जनावरांना प्रशासनाकडून चारा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होऊ लागली आहे़ अनेक संस्थांनी चारा छावणीचे प्रस्ताव प्रशासनाकडे दाखल केले आहेत़ उमरगा, लोहारा तालुका वगळता इतर तालुक्यांमधून सध्या चारा छावण्यांचे प्रस्ताव प्रशासनाकडे दाखल झाले आहेत़ सर्वाधिक तब्बल १७५ प्रस्ताव भूम तालुक्यातून दाखल झाले आहेत़ यातील केवळ पाच प्रस्ताव पूर्ण असून, ते वरिष्ठांकडे पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले़ तर इतरांना प्रस्तावातील त्रुटी दूर करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत़ शिवाय कळंब तालुक्यातून १५ प्रस्ताव दाखल असून, यातील केवळ ३ प्रस्ताव पूर्ण आहेत़ तर इतर प्रस्तावांमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत़ वाशी तालुक्यातून २० तर तुळजापूर तालुक्यातून दोन प्रस्ताव दाखल आहेत़ परंडा तालुक्यातून ३४ चारा छावणीचे प्रस्ताव तहसीलकडे धडकले आहेत़ उस्मानाबाद तालुक्यातून १३ प्रस्ताव दाखल झाले आहेत़ तालुक्यातील जुनोनी, उपळा, कसबे तडवळे, ढोकी, वाखरवाडी, तुगाव, तेर, खामगाव, वाघोली, बेंबळी, जागजी आदी गावातून प्रस्ताव आले आहेत़ यातील पाच प्रस्ताव पूर्ण आहेत़ तर दोन प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले़

जनावरे जगविणे मुश्किल झाले
भूम तालुक्यातील दुष्काळाची तीव्रता वाढत असून, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे़ प्रशासनाकडे चारा छावणीचे शेकडो प्रस्ताव दाखल झाले आहेत़ मात्र, त्याला मंजुरी मिळालेली नाही़ चाऱ्याअभावी जनावरे जगविणे मुश्किल झाले असून, प्रशासनाने विनाअट छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी चिंचोलीचे सरपंच महादेव वारे यांनी केली़

Web Title: 259 proposals of fodder camp in six talukas of Osmanabad district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.