मुरुम : रस्ता दुरूस्तीचे काम सुरू असल्याचे कारण देत उमरगा तालुक्यातील केसरजवळगामार्गे ये-जा करणाऱ्या विविध आगाराच्या दिवसभरातील २४ बसफेऱ्या मागील आठ दिवसांपासून बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे ऐन सणासुदीच्या काळात गैरसोय झाली. गुरुवारी मकरसंक्रातीच्या दिवशीही सायंकाळी पाच पर्यंत बसफेऱ्या बंदच असल्याचे दिसून आले. दरम्यान, पर्यायी रस्ता असतानाही एसटीच्या चालक आणि वाहकांकडून दिशाभूल केली जात असल्याचा आरोप या भागातील प्रवाशांमधून केला जात आहे.
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून आठ दिवसांपूर्वी केसरजवळगा ते बेळंब रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले होते. या कामासाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून ४० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या रस्त्याचे काम सध्या सुरू असले तरी बस वाहतूक होऊ शकते, अशी स्थिती आहे. शिवाय, पर्यायी मार्गदेखील उपलब्ध आहे. असे असतानाही या मार्गावरून धावणाऱ्या उमरगा व अक्कलकोट आगाराच्या दिवसभरातील २४ बसफेऱ्या गेल्या आठ दिवसांपासून बंद आहेत. बुधवारी वेळाअमावस्या झाली. यानंतर गुरुवारी मकरसंक्रातीचा सण झाला. परंतु, ऐन सणासुदीच्या काळात बसफेऱ्या बंद असल्याने नागरिकांचे हाल झाले.
केसरजवळगा गावाला येण्यासाठी मुरुम-बेळंब मार्गे आणि आलूर फाटामार्गे असे दोन मार्ग आहेत. यातील बेळंब-केसरजवळगा या रस्त्यावर दुरुस्तीचे काम सुरू असल्याने बसफेऱ्या बंद करण्यात आल्या. यामुळे प्रवाशांची तर गैरसोय झालीच. शिवाय एसटी महामंडळाचे रोजचे उत्पन्नही बुडत आहे.
प्रतिक्रिया......
केसरजवळगा-बेळंब रस्त्यावर दुरुस्तीचे काम सुरू असल्याने बसफेऱ्या आठ दिवसांपासून बंद आहेत. या रस्त्यावर खडी असल्याने बसफेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. परंतु, पर्यायी मार्ग उपलब्ध असेल तर बसफेऱ्या पुन्हा सुरू करण्यात येतील.
- प्रसाद कुलकर्णी, आगारप्रमुख, उमरगा
रस्ता वाहतुकीसाठी योग्य आहे. वाहतूक सेवेला अडथळा होईल असे कोणतेही काम या मार्गावर सुरू नाही. केसरजवळगा-बेळंब रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू होते. मात्र, या कामामुळे बस बंद होईल असे कोणतेही काम कंत्राटदाराकडून केले गेले नाही. रस्ता बस वाहतुकीसाठी योग्य आहे. त्यामुळे बसफेऱ्या पूर्ववत करण्यात कोणतीही अडचण नाही. शिवाय, पर्यायी मार्गदेखील उपलब्ध असून, या मार्गावरूनही वाहतूक करता येईल.
- व्ही. जी. चिडगुपकर, उपकार्यकारी अभियंता, उमरगा
रस्ता कामाच्या नावाखाली गेल्या आठ दिवसांपासून केसरजवळगा मार्गे ये-जा करणाऱ्या बसफेऱ्या बंद ठेवण्यात आल्या. यामुळे ऐन सणासुदीच्या काळात बससेवा बंद करुन प्रवाशांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरू आहे. रस्ता वाहतुकीस योग्य असल्याची माहिती ग्रामपंचायतीने आगारप्रमुख यांना देणे आवश्यक आहे.
- जयपालसिंग राजपूत, ग्रामपंचायत सदस्य, केसरजवळगा