२० जणांची कोरोनावर मात, तरी महिनाभरापासून रुग्णालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:21 IST2021-07-19T04:21:18+5:302021-07-19T04:21:18+5:30
उस्मानाबाद : कोरोनातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर अनेकांना पोस्ट कोविड आजाराचा त्रास होत असल्याचे दिसून येते. यापैकी २० जण अद्यापही शासकीय ...

२० जणांची कोरोनावर मात, तरी महिनाभरापासून रुग्णालयात
उस्मानाबाद : कोरोनातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर अनेकांना पोस्ट कोविड आजाराचा त्रास होत असल्याचे दिसून येते. यापैकी २० जण अद्यापही शासकीय रुग्णालयात महिनाभरापासून उपचार घेत असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी पोस्ट कोविड रुग्ण पुढे येऊ लागले आहेत.
जिल्ह्यातील ६३ हजार १४ नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती. यापैकी ६० हजार ४४० रुग्णांनी काेरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. कोविडवर मात करणाऱ्यांची संख्या जास्त असली तरी कोविडमुक्त झालेले अनेक व्यक्ती पाहिजे ती दक्षता घेत नसल्याचे दिसून येत आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत अनेकांना कोरोनाची बाधा झाली होती. मागील महिनाभरापासून कोरोना बाधितांची संख्या घटू लागली आहे. मात्र, असे असले तरी कोरोनातून बरे झालेल्यांना पोस्ट कोविडचा त्रास जाणवू लागला आहे. कोरोनातून बरे झालेले २० रुग्ण महिनाभरापासून जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत.
चालताना लागतेय धाप, काळ्या बुरशीचा आजार
कोविडवर मात केलेल्याची संख्या मोठी आहे. अनेक कोविडमुक्त व्यक्तींना सध्या चालताना धाप लागत असल्याचे निदर्शनास आले आहे.
काहींना काळ्या बुरशीचा आजार म्हणजे म्युकरमायकोसिस या आजाराने कवेत घेतल्याचे समोर आले आहे.
बरे झाल्यानंतरही घ्या काळजी
कोविडमुक्त झालेल्या व्यक्तीने घराबाहेर पडल्यानंतर नेहमीच मास्कचा वापर केला पाहिजे.
अशा व्यक्तीने गर्दीच्या ठिकाणी नेहमीच इतर व्यक्तींपासून किमान तीन मीटर अंतर दूर राहावे.
श्वास घेण्यास त्रास होत असल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावा.
सर्वाधिक धोका ज्येष्ठांना
वयाची साठी पार केलेल्या अनेक व्यक्तींना उच्च रक्तदाब, मधुमेह आदी आजार असतात. अशाच व्यक्तींना तसेच पूर्वी विविध आजार असलेल्यांना पोस्ट कोविडचा सर्वाधिक धोका असल्याचे आरोग्य यंत्रणेतील तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे अशा व्यक्तिंनी सध्याच्या संकटात अधिक दक्ष राहण्याची गरज आहे.
कोट....
पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत अधिक रुग्ण आढळून आले. रुग्ण कमी होत असले तरी पोस्ट कोविडचे रुग्ण वाढत आहेत. ३० टक्के रुग्ण हे पोस्ट कोविडचे आहेत. कोविडमुक्त झाल्यानंतर प्रत्येक व्यक्तीने विशेष काळजी घेतली पाहिजे. यात प्रामुख्याने फिजिकल डिस्टन्सिंग तसेच मास्कचा वापर केला पाहिजे. शिवाय काही त्रास जाणवल्यास नजीकच्या रुग्णालयात जाऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावेत. तसेच कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी योगा करण्यावर भर द्यावा.
डॉ. इस्माईल मुल्ला
पॉईंटर...
कोरोनाचे एकूण रुग्ण ६३,०१४
बरे झालेले रुग्ण ६०,४४०
कोरोनाचे एकूण बळी १३९१
सध्या उपचार सुरु ६७५