शाळेत दिलेल्या आयर्न-फॉलिक अॅसिडच्या गोळ्यांमुळे १९ विद्यार्थ्यांना उलटी, मळमळचा त्रास
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 16:19 IST2024-12-09T16:18:20+5:302024-12-09T16:19:32+5:30
शाळा प्रशासनाने तातडीने सर्व विद्यार्थांना मुरूम येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

शाळेत दिलेल्या आयर्न-फॉलिक अॅसिडच्या गोळ्यांमुळे १९ विद्यार्थ्यांना उलटी, मळमळचा त्रास
उमरगा (धाराशिव): तालुक्यातील केसरजवळगा गावातील गांधी विद्यालयात विद्यार्थ्यांना रक्तवाढीसाठी आयर्न फॉलिक अॅसिडच्या गोळ्या आज देण्यात आल्या. मात्र, काहीवेळातच १९ विद्यार्थ्यांना उलटी, मळमळचा त्रास जाणवू लागला. त्यांना तातडीने मुरूम येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
केसर जवळगा गावातील महात्मा गांधी विद्यालयास येथील शासकीय रुग्णालय उपकेंद्रच्यावतीने रक्तवाढीसाठी आयर्न-फॉलिक अॅसिडच्या गोळ्या देण्यात आल्या होत्या. सोमवारी सकाळी विद्यार्थ्यांना गोळ्या देण्यात आल्या. त्याचे सेवन केल्यानंतर १९ विद्यार्थ्यांना उलट्या, मळमळ होऊ लागले. शाळा प्रशासनाने तातडीने सर्व विद्यार्थांना मुरूम येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
दरम्यान, ४ विद्यार्थ्यांना सलाईनच्या माध्यमातून उपचार सुरू आहेत. तर १५ विद्यार्थ्यांना टॅब्लेटद्वारे उपचार करण्यात आले असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश अरधले स्वामी यांनी दिली. माहिती मिळताच पालकांनी रुग्णालयात धाव घेतली. तसेच माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी देखील रुग्णालयात जाऊन विद्यार्थ्यांची प्रकृती जाणून घेतली.