१० टन ढोबळी मिरची शेतातच कुजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:36 IST2021-08-24T04:36:50+5:302021-08-24T04:36:50+5:30
तामलवाडी (जि. उस्मानाबाद) : सध्या भाजीपाला बाजारात ढोबळी मिरचीचे दर चांगलेच पडले आहेत. अगदी काढणीही परवडणारी नाही, अशी स्थिती ...

१० टन ढोबळी मिरची शेतातच कुजली
तामलवाडी (जि. उस्मानाबाद) : सध्या भाजीपाला बाजारात ढोबळी मिरचीचे दर चांगलेच पडले आहेत. अगदी काढणीही परवडणारी नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने जोपासलेली मिरची रानातच कुजत आहे. तुळजापूर तालुक्यातील खडकी शिवारात हे चित्र ठिकठिकाणी दिसून येत आहे.
खडकी शिवारात ढोबळी मिरचीचे उत्पादन शेतकरी मोठ्या प्रमाणात घेतात. येथील संभाजी जाधव, शिवाजी जाधव, तानाजी जाधव, नेताजी जाधव या चार भावांनी माळरान जमिनीवर ठिबक सिंचन व पॉलिथीन पेपरचा आधार घेत गादी वाफ्यावर २५ मे रोजी ४० हजार ढोबळी मिरची रोपाची लागवड केली. एका मिरची रोपासाठी दीड रुपये मोजावे लागले. उत्तम नियोजन, कीड व्यवस्थापन करून त्यांनी प्रत्येकी ३० गुंठे मिरचीचे संगोपन केले आहे. ४५ दिवसांत फळधारणा होऊन रोपाला मिरच्या लगडल्या. जुलै महिन्यात पहिली तोड झाली. त्यावेळी संभाजी जाधव यांना ५०० किलो मिरचीचे उत्पादन मिळाले. त्यास २० रुपये प्रति किलोप्रमाणे दर मिळाला. भाव टिकून राहील, या अपेक्षेने मेहनत करून फवारणी-खते आदीचा खर्च त्यांनी नंतरही केला. मात्र, पंधरा दिवसांपासून बाजारात भाजीपाल्याचे दर घसरल्याने २० रुपये दराने विकणारी मिरची ५ ते ७ रुपयांना जात आहे. इतर शेतकऱ्यांच्या मिरच्या बाजारात पोहोचण्याआधीच दर पडल्याने या चार शेतकऱ्यांनी चार लाख रुपये केलेला खर्च मातीमोल झाला आहे. त्यांची सुमारे १० टन ढोबळी मिरची रानातच कुजत आहे.
व्यापाऱ्यांनी फिरवली पाठ...
कोरोना काळात राज्याबाहेरील व्यापारी मिरची खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या बांधावर येत होते. आता अनलॉक असतानाही व्यापारी मिरची खरेदीसाठी फिरकताना दिसत नाहीत. आलेच तर कवडीमोल दराने मागणी करून शेतमालाची हेटाळणी करीत असल्याचे दिसून येत आहे.
अपेक्षेवर पाणी फिरले...
ढोबळी मिरची उत्पादनातून मुलीचे शिक्षण, शेतीचा विकास करण्याचे स्वप्न बाळगले होते. मात्र, भाव ढासळल्याने अपेक्षेवर पाणी फिरले आहे. पुण्यातील नोकरी सोडून गावाकडे आलो. शेती करायला लागलो. पण, इथेही शेतीमालाला भाव मिळत नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. रात्रंदिवस कष्ट करूनही त्याचे चीज होत नाही.
- संभाजी जाधव, शेतकरी, खडकी