शिंदेसेनेच्या कार्यकर्त्याला संपवलं, कुटुंब वाऱ्यावर; मुलीचा आक्रोश, गावकरही हळहळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 16:27 IST2025-03-25T16:26:32+5:302025-03-25T16:27:23+5:30

मोठ्या मुलीला पोलीस, इंजिनिअर करणार तसेच लहान मुलगी, मुलालाही उच्चशिक्षित करण्याचं युवराज यांचं स्वप्न होते. या आठवणी सांगताना लावण्याला रडू कोसळले

Yuvraj Koli, a Shiv Sena workers of Eknath Shinde Party, was murdered in Jalgaon, Koli family meet police superintendent | शिंदेसेनेच्या कार्यकर्त्याला संपवलं, कुटुंब वाऱ्यावर; मुलीचा आक्रोश, गावकरही हळहळले

शिंदेसेनेच्या कार्यकर्त्याला संपवलं, कुटुंब वाऱ्यावर; मुलीचा आक्रोश, गावकरही हळहळले

जळगाव - "तुला पोलीस करणार असं सांगणारे माझे पप्पा आज या जगात नाहीत. त्यांचे हे स्वप्न स्वप्नच राहिले असून आता मी बाप कुणाला म्हणू.." असा भावनिक प्रश्न विचारत मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी कानसवाडा शेळगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच युवराज कोळी यांची मुलगी लावण्या हिने केली आहे. वडिलांच्या निधनानंतर घरातील आठवणी सांगताना तिला अश्रू अनावर झाले होते. 

कानसवाडा-शेळगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आणि शिंदेसेनेचे कार्यकर्ते असलेले युवराज कोळी यांचा २१ मार्च रोजी सकाळी खून करण्यात आला. घरातील कर्ता व्यक्ती गेल्याने कोळी कुटुंब उघड्यावर आले आहे. घरातील वृद्ध आई वडिलांचा आधार, पत्नीचे कुंकू व चिमुकल्यांचे पितृछत्रही हिरावल्याने सर्वजण स्तब्ध झाले आहेत. या खून प्रकरणातील सर्व तीनही संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. या सर्वांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी मयताच्या पत्नी, आई वडील, २ मुली आणि २ वर्षाच्या मुलासह नातेवाईक, समाजबांधवांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. 

कुटुंबाचा कंठ दाटून आला

मयत युवराज कोळी यांची मोठी मुलगी लावण्या सहावीत असून लहान मुलगी चौथीत आहे. मोठ्या मुलीला पोलीस, इंजिनिअर करणार तसेच लहान मुलगी, मुलालाही उच्चशिक्षित करण्याचं युवराज यांचं स्वप्न होते. या आठवणी सांगताना लावण्याला रडू कोसळले. अत्यंत भावनिक प्रश्न विचारत त्यांनी माझ्या पप्पांना या जगात ठेवले नाही. त्यांनाही या जगात राहण्याचा अधिकार नाही. त्यामुळे त्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणीही लावण्यानं केली. तिच्यासह कोळी यांच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

काय घडलं होतं?

२१ मार्च रोजी नेहमीप्रमाणे युवराज कोळी शेतात काम करत असताना त्यांच्यावर हॉटेल व्यावसायिक भरत पाटील यांच्यासह तिघांनी चाकूने भोसकून हत्या केली. गुरुवारी रात्री भरत पाटील आणि युवराज कोळी यांच्यात वाद झाला होता. २०२१ साली कोरोना काळात भरत पाटील याने परमिट रूम, बिअर बार शासनाने निश्चित वेळेपेक्षा अधिक वेळ सुरू ठेवले होते. त्यावेळी युवराज कोळी गावचे उपसरपंच होते. तेव्हा कोळी यांनी भरत पाटील यांना विरोध केला होता. गुरुवारी रात्री काहीही कारण नसताना जुना वाद डोक्यात ठेवत भरत पाटील यांनी कोळी यांना तुम्ही गावचा काय विकास केला असा जाब विचारला. त्यानंतर शुक्रवारी सकाळी शेतात भरत पाटील, परेश पाटील, देवेंद्र पाटील यांनी युवराज कोळी यांची त्याच्या २ वर्षाच्या मुलासमोरच चाकूने हत्या केली.

गुलाबरावांना पाहताच मुलगी धाय मोकलून रडली

या घटनेची माहिती मिळताच तात्काळ मंत्री गुलाबराव पाटील हॉस्पिटलला पोहचले. युवराज कोळी हा शिवसेनेचा कार्यकर्ता होता. त्याचा खून झाल्याचं कळलं, त्यामुळे तातडीने इथं धाव घेतली. या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं त्यांनी सांगितले. यावेळी गुलाबराव पाटील यांनी कोळी कुटुंबाचं सांत्वन केले तेव्हा पाटलांना पाहून मयत युवराज कोळी यांच्या मुलगी त्यांच्या गळ्यात पडून धाय मोकलून रडली. 
 

 

Web Title: Yuvraj Koli, a Shiv Sena workers of Eknath Shinde Party, was murdered in Jalgaon, Koli family meet police superintendent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.