प्रेमसंबंधातून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रेयसीच्या प्रयत्नामुळे मिळाला मदतीचा हात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2021 00:11 IST2021-01-28T00:10:52+5:302021-01-28T00:11:15+5:30
कुटुंबीयांचा विरोध : मंगळवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास वाशी खाडीपुलावर ही घटना घडली.

प्रेमसंबंधातून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रेयसीच्या प्रयत्नामुळे मिळाला मदतीचा हात
नवी मुंबई :कुटुंबीयांनी प्रेमविवाहाला विरोध केल्याने प्रियकराने खाडीपुलावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. या वेळी तिथे उपस्थित प्रेयसीने वेळीच पोलिसांना कळवून मदत मागितल्याने त्याचे प्राण वाचले आहेत. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी दोघांच्या कुटुंबीयांना बोलावून त्यांचे समुपदेशन केले आहे.
मंगळवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास वाशी खाडीपुलावर ही घटना घडली. मानखुर्द येथील महाराष्ट्रनगर परिसरात राहणारे एक प्रेमी युगुल त्या ठिकाणी आले होते. दोघांमध्ये अनेक महिन्यांपासून प्रेम असून त्यांचे लग्नासाठी प्रयत्न सुरू होते. परंतु दोघांच्या घरच्यांनी त्यांच्या प्रेमसंबंधाला विरोध केला होता. त्यामुळे मंगळवारी रात्री दोघेही वाशी खाडीपुलावर भेटून चर्चा करत होते. या वेळी कुटुंबीयांकडून होत असलेल्या विरोधावरून दोघेही चिंतित होते. त्याचवेळी तरुणाने पुलावरून खाडीत उडी मारली. तो पाण्यात बुडत असतानाच तरुणीने तत्काळ पोलिसांना फोनवरून घटनेची माहिती दिली. त्यानुसार वाशी पोलीस, सागरी पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेत मच्छीमारांना मदतीसाठी बोलावले. त्यानुसार महेश सुतार व अभिषेक जैसवाल हे पोहोचले. त्यांनी पोलिसांसह बोटीने खाडीत पाहणी सुरू केली. या वेळी एक तरुण बुडताना आढळून येताच सुतार यांनी त्याला मदतीचा हात देऊन त्याचे प्राण वाचविले.
पालकांचे समुपदेशन
या घटनेनंतर तरुण-तरुणीकडे चौकशी केली असता, त्यांच्या प्रेमसंबंधाला घरच्यांचा विरोध असल्याने तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आले, असे वरिष्ठ निरीक्षक संजीव धुमाळ यांनी सांगितले. त्यामुळे दोघांच्या कुटुंबीयांना बोलावून समुपदेशन करून मुलांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.