The youth murder from old quarrel issues in moshi | मोशीत जुन्या भांडणाचा राग मनात धरून तरुणाचा खून
मोशीत जुन्या भांडणाचा राग मनात धरून तरुणाचा खून

पिंपरी : जुन्या भांडणाचा राग मनात धरून दगडाने मारल्याने तरुण गंभीर जखमी झाला. मोशीतील आदर्शनगर येथे मंगळवारी (दि. ११) रात्री ही घटना घडली. गंभीर जखमी असतानाही उपचार न घेता जखमी तरुण रात्री झोपला. बुधवारी दुपारी डोक्यात जास्त दुखायला लागल्याने रुग्णालयात नेले असता रुग्णालयात तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, याप्रकरणी एका तरुणास अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुफस्सिर उर्फ आझीम जकीउद्दीन काझी (वय २८, रा. आदर्शनगर मोशी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. संदीप अशोक गौड (वय २५, रा. आदर्शनगर, मोशी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सचिन गौतम भोसले (वय ३८, रा. आदर्शनगर, मोशी) यांनी फिर्याद दिली आहे.
मयत काझी आणि त्याच्या तोंड ओळखीचा संदीप यांच्यामध्ये दोन दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून वाद झाला. याचा राग मनात धरून संदीपने मंगळवारी (दि. ११) रात्री काझीवर दगडफेक केली. यातील एक दगड काझीच्या डोक्याला लागला. मात्र, काझी उपचार न घेता तसाच घरी जाऊन झोपला. बुधवारी दुपारी अचानक जास्त त्रास होऊ लागल्याने त्याला पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल केले. काझीवर उपचार सुरू असताना दुपारी अडीचच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.


Web Title: The youth murder from old quarrel issues in moshi
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.