नगरमध्ये जुन्या वादातून तरुणाचा खून, नीलक्रांती चौकात घडली घटना
By अण्णा नवथर | Updated: June 20, 2023 13:42 IST2023-06-20T13:42:35+5:302023-06-20T13:42:57+5:30
वादाचे रूपांतर भांडणात, आरोपीने केले सपासप वार

नगरमध्ये जुन्या वादातून तरुणाचा खून, नीलक्रांती चौकात घडली घटना
अण्णा नवथर, लोकमत न्यूज नेटवर्क, अहमदनगर: जुन्या वादातून तलवारीने वार करत एका २४ वर्षीय तरुणाचा खून करण्यात आला. ही घटना मंगळवारी (२० जून) पहाटे एक वाजेच्या सुमारास दिल्लीगेट परिसरातील नीलक्रांती चौकात घडली. ओमकार उर्फ गामा पांडुरंग भागानगरे (24 ,रा.माळीवाडा ) असे मयताचे नाव आहे. याप्रकरणी तीन जणांवर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश केरूप्पा हुचे ,नंदू बोराटे, संदीप गुडा, असे गुन्हा दाखल झालेल्या इसमांची नावे आहेत. याबाबत ओमकार रमेश घोलप यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की जुन्या वादातून मयत व आरोपी यांच्यात मंगळवारी पहाटे एक वाजेच्या सुमारास दिल्लीगेट परिसरातील नीलक्रांती चौकात वाद झाला. वादाचे रूपांतर भांडणात होऊन आरोपींनी भागानगरे याच्यावर तलवारीने सपासप वार केले. त्यात भागानगरे मयत झाले असून, शुभम पाटोळे हे जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत ,अशी माहिती पोलिसांनी दिली.