नोकरीचे प्रलोभन दाखवून तरुणीवर बलात्कार, आरोपीला अटक, ५ दिवसांची पोलीस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 09:57 IST2025-07-20T09:57:48+5:302025-07-20T09:57:54+5:30
या तरुणीला लोढा याने नोकरीचे प्रलोभन दाखविले होते. याच बहाण्याने त्याने तिला अंधेरीतील एका हॉटेलमध्ये भेटायलाही बोलवले अन्..

नोकरीचे प्रलोभन दाखवून तरुणीवर बलात्कार, आरोपीला अटक, ५ दिवसांची पोलीस कोठडी
मुंबई : एका १९ वर्षीय तरुणीला नोकरीचे प्रलोभन दाखवत तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी साकीनाका पोलिसात गुन्हा दाखल करून तो अंधेरीच्या एमआयडीसी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यानुसार पोलिसांनी समाज सेवक प्रफुल्ल लोढा (६३) या व्यक्तीला गुरुवारी अटक केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीची आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे. तिच्या तक्रारीनुसार, या तरुणीला लोढा याने नोकरीचे प्रलोभन दाखविले होते. याच बहाण्याने त्याने तिला अंधेरीतील एका हॉटेलमध्ये भेटायलाही बोलवले. पीडित तरुणी त्याठिकाणी पोहोचल्यानंतर त्याने तिथे तिच्यावर जबरी संबंध प्रस्थापित केले. हा प्रकार तिच्या संमतीशिवाय घडल्याचा आरोप आहे.
पाच दिवसांची पोलीस कोठडी
पीडितेने कुटुंबीयांना याबाबत सांगितल्यावर त्यांनी तिला रुग्णालयात नेले. तेथे तिच्यावर अत्याचार झाल्याचे उघड झाले. त्यानंतर मुलीने साकीनाका पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी पीडितेचा जबाब नोंदवत ७ जुलै रोजी लोढा विरोधात गुन्हा दाखल केला. ही घटना अंधेरी पूर्वच्या एमआयडीसी पोलिसांच्या हद्दीत घडल्याने हे प्रकरण पुढील तपासासाठी एमआयडीसी पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. पोलिसांनी प्रफुल लोढाला १७ तारखेला अटक करून स्थानिक न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले.