धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 05:44 IST2025-10-15T05:43:53+5:302025-10-15T05:44:03+5:30
जालना रोडवरील अपना मार्केटमागील सेंट फ्रान्सिस शाळेच्या मैदानावर रात्री कायम अंधार असतो. त्यामुळे हे मैदान रात्रभर मद्यपी आणि नशेखोरांचा अड्डा बनलेले असते.

धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...
छत्रपती संभाजीनगर : जालना रोडवरील सेंट फ्रान्सिस शाळेच्या निर्जन मैदानावर एका तरुणाची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना मंगळवारी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. ही माहिती कळताच जवाहरनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा सुरू करून संशयितांची धरपकड सुरू केली होती.
सुरेश भगवान उंबरकर (वय अंदाजे ३०, रा. कैलासनगर), असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, सुरेश हा कूक होता. जालना रोडवरील अपना मार्केटमागील सेंट फ्रान्सिस शाळेच्या मैदानावर रात्री कायम अंधार असतो. त्यामुळे हे मैदान रात्रभर मद्यपी आणि नशेखोरांचा अड्डा बनलेले असते. मंगळवारी रात्री मैदानावर अंधारात काहीतरी अघटित घडत असल्याचे दुसऱ्या मद्यपींनी पाहिले. यामुळे ते तिकडे गेले असता काही जणांनी एका तरुणाचा गळा चिरला आणि ते पळून जात असल्याचे त्यांना दिसले. या घटनेची माहिती त्यांनी जवाहरनगर पोलिसांना कळवली. पोलिस निरीक्षक सचिन कुंभार, पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी आणि अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. एका तरुणाची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याचे भयंकर दृश्य तेथे होते. पोलिसांनी मृताची ओळख पटविली. त्याचे नाव सुरेश उंबरकर असल्याचे समजले. ही माहिती मृताच्या नातेवाइकांपर्यंत व नजीकच्या कैलासनगर, विष्णूनगर, भानुदासनगर परिसरात पसरताच अनेक बघ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृताच्या नातेवाईक महिलेने ते दृश्य पाहून हंबरडा फोडला. मध्यरात्री घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह घाटीत हलविण्याची प्रक्रिया सुरू केली होती.
तो करायचा ऑम्लेट सेंटरवर काम
गेल्या काही दिवसांपासून सुरेश हा हेडगेवार रुग्णालयासमोरील ऑम्लेट सेंटरवर काम करीत होता. लग्नानंतर काही वर्षांतच त्याचा घटस्फोट झाला होता. मंगळवारी रात्री तो कैलासनगर येथे मित्रासोबत दिसला होता, असे घटनास्थळी आलेल्या लोकांनी सांगितले. त्याची हत्या कोणी केली आणि हत्येचे कारण काय? याचा शोध पोलिसांनी सुरू केला.