Jalgaon Crime : तरुण-तरुणींचे विवाह जुळत नाहीत म्हणून एखाद्या विवाह संस्थेमध्ये नाव नोंदणी करून लग्न जुळवण्याचा प्रयत्न केला जातो. याच गोष्टीचा फायदा घेत जळगावातील एका तरुणाने शासकीय अधिकारी असल्याचे भासवत विवाहासाठी इच्छुक असलेल्या महिलांकडून लाखो रुपये उकळले आहेत. घटस्फोटित, एकल पालक, विधवा अशा महिलांना टार्गेट करुन आरोपींने त्यांची लाखो रुपयांची फसवणूक केली.
कोणाला नायब तहसीलदार तर कोणाला क्लास वन ऑफिसर सांगून धरणगाव येथील निनाद विनोद कापुरे याने लग्नाच्या नावाने अनेक तरुणींना गंडवल्याचा प्रकार उघडकीस आला. यासंदर्भात नाशिक आणि फलटण येथील तरुणींनी पोलीस अधीक्षकांना भेटून लेखी तक्रार केली. यापैकी फलटणची तरुणी डॉक्टर आहे. तरुणींच्या तक्रारीवरुन नाशिक व फलटण येथे त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल झालेला आहे, मात्र नाशिकच्या गुन्ह्यात अद्याप अटक झालेली नाही.
तरुणींनी दिलेल्या माहितीनुसार, मॅरेज ब्युरो या ऑनलाइन साईटवरुन निनाद कापुरे याने त्यांच्याशी संपर्क साधला होता. आई, वडिलांच्या संमतीने त्याने नाशिकच्या तरुणीकडून त्याने सात लाख तर फलटणच्या डॉक्टर तरुणीकडून आठ लाख रुपये उकळले. आपल्याला पदोन्नती मिळाली असून, पुणे येथे तहसीलदार पदावर नियुक्ती होत असल्याने पैशाची गरज असल्याचे सांगून त्याने ही रक्कम घेतली होती.
धक्कादायक बाब म्हणजे निनाद हा आधीच विवाहित होता. त्याचीही कोर्टात केस सुरु असल्याचे समजल्याने या दोन्ही तरुणींनी तक्रारी केल्यावरुन त्याच्याविरुद्ध फलटण आणि नाशिकला गुन्हा दाखल झाला. फलटणच्या गुन्ह्यात त्याला अटक झाली असून नाशिकच्या गुन्ह्यात अटक झालेली नाही. त्यामुळे त्याला अटक व्हावी, उकळलेली रक्कम परत मिळावी व भविष्यात आणखी तरुणींची फसवणूक होऊ नये यासाठी पोलिस अधीक्षकांना भेटून लेखी तक्रार केल्याचे या तरुणींनी सांगितले.
सहा तरुणींची फसवणूक
सरकारी लाल दिव्याच्या वाहनातील तसेच तहसीलदारांच्या खुर्चीवर बसलेले फोटो या तरुणींना त्याने पाठविले आहेत. हे सर्व फोटो व पैशाचे पुरावे पोलिस अधीक्षकांकडे सादर करण्यात आले आहेत. आतापर्यंत त्याने अशाच प्रकारे सहा तरुणींना फसविले असल्याचे या तरुणींनी सांगितले.