'फटका गँग'मुळे तरुणाने गमावला पाय; वेदनेने तडफडत असतानाही आरोपीने मोबाईल हिसकावून पळ काढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 14:02 IST2025-08-04T13:52:09+5:302025-08-04T14:02:37+5:30

कल्याण रेल्वे पोलिसांनी प्रवाशाला लुटणाऱ्या इराणी टोळीतील एका अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे.

young man fell from the train after being hit by a mobile thief in the Tapovan Express in kalyan | 'फटका गँग'मुळे तरुणाने गमावला पाय; वेदनेने तडफडत असतानाही आरोपीने मोबाईल हिसकावून पळ काढला

'फटका गँग'मुळे तरुणाने गमावला पाय; वेदनेने तडफडत असतानाही आरोपीने मोबाईल हिसकावून पळ काढला

Kalyan Crime: लोकलच्या दारात उभे असताना रुळांलगत असलेल्या चोरट्यांकडून फटका मारुन मोबाईल हिसकावण्याचे प्रकार मध्य रेल्वेवर पुन्हा वाढले आहेत. त्यामुळे रेल्वेच्या प्रवाशांमध्ये ‘फटका गँग’ची मोठी दहशत निर्माण झाली आहे. अशातच रविवारी नाशिकच्या एका तरुणाचा फटका गँगमुळे पाय मोडला. कामानिमित्ताने ठाण्यात आलेल्या प्रवाशावर तपोवन एक्सप्रेसने परतत असताना एका चोरट्याने फटका मारुन मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात तरुण एक्स्प्रेसमधून खाली पडला. चोरट्याने रुळांशेजारी पडलेल्या तरुणाला माराहाण करुन त्याच्याकडील पैसे आणि मोबाईल लांबवला. त्यानंतर पोलिसांनी काही तासांतच आरोपीला अटक केली.

रविवारी सकाळी कल्याण रेल्वे स्थानकाजवळ घडलेल्या एका धक्कादायक घटनेत एक्स्प्रेसमधील प्रवाशावर हल्ला करण्यात आला आणि त्याचा मोबाईल फोन हिसकावून घेण्यात आला. नाशिक येथील रहिवासी २६ वर्षीय गौरव निकम कामानिमित्ताने आला होता. त्याने ठाण्याहून नाशिकला जाण्यासाठी तपोवन एक्सप्रेस पकडली होती.  मात्र प्रवास करत असताना शहाड आणि आंबिवली स्थानकांदरम्यान एका अज्ञाताने अचानक त्याच्या हातावर फटका मारला आणि त्याचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात गौरव खाली पडला आणि जबर जखमी झाला. यानंतर पोलिसांनी काही तासांतच इराणी गँगमधील अल्पवयीन आरोपीला अटक केली.

गौरव निकम हा तपोव एक्सप्रेसमधील दरवाज्याजवळ फोनवर बोलत उभा होता. गाडी शहाड ते आंबिवलीदरम्यान इराणी पाडाजवळ ट्रेनचा वेग कमी असताना आधीच दबा धरुण बसलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने त्याच्या हातावर जोरात फटका मारला. अचानक फटका बसल्याने गौरवचा तोल गेला आणि तो खाली पडला. खाली पडताच गौरवचा डावा पाय चाकाखाली आला.

गौरव वेदनेने तडफडत असतानाही १६ वर्षीय आरोपी त्याच्याजवळ आला आणि त्याच्या खिशातून फोन आणि २० हजार रुपये हिसकावून घेतले. गौरवने प्रतिकार केला तेव्हा त्याला जबर मारहाण करण्यात आली. काही रस्त्याने जाणाऱ्यांनी कल्याण रेल्वे पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर रेल्वे पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि गौरवला उपचारासाठी कल्याणमधील रेल्वे रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र परिस्थिती गंभीर असल्याने त्याला एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

यानंतर कल्याण रेल्वे पोलिसांनी तपासासाठी तीन पथके तैनात करण्यात आली. पोलिसांनी गौरवला काही संशयितांचे फोटोदेखील दाखवले. त्यातील आरोपीला गौरवने ओळखले. त्यानंतर पोलिसांनी आंबिवलीतील इराणी पाडा येथून अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले. आंबिवली रेल्वे स्थानकाच्या ट्रॅकला लागून असलेला इराणी पाडा हा चोरी आणि साखळी चोरीच्या घटनांसाठी कुप्रसिद्ध आहे. स्थानिक गुन्हेगारांच्या पूर्वीच्या अटकेमुळे अशा गुन्ह्यांना तात्पुरते थांबविण्यात आले होते, पण अलीकडेच घटना पुन्हा सुरू झाल्या आहेत.
 

Web Title: young man fell from the train after being hit by a mobile thief in the Tapovan Express in kalyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.