पुणे - पूर्व वैमनस्यासह किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून डोक्यात कुऱ्हाड व दगड घालून एका तरुणाचा निर्घृण खून केल्याची घटना पंचशील नगर येरवडा याठिकाणी सोमवारी रात्री घडली. या घटनेत प्रतीक हनुमंत वन्नाळे (वय 28, रा. पंचशील नगर येरवडा) याचा खून झाला असून याप्रकरणी येरवडा पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. यात एका अल्पवयीन बालकाचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पंचशील नगर येरवडा कॉमरझोन समोरील मोकळ्या मैदानात हत्यारे घेऊन भांडणे सुरू असल्याची माहिती येरवडा पोलिसांना मिळाली होती. घटनास्थळी तात्काळ येरवडा पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी रवाना झाले. घटनास्थळी दोन गटात झालेल्या वादातून एकावर कुऱ्हाड व दगडाने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गंभीर जखमी अवस्थेत प्रतिक याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.
येरवड्यात किरकोळ कारणावरून तरुणाचा निर्घृण खून, अल्पवयीन बालकासह तीन जण ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2020 11:52 IST