"मित्रानो माफ करा, जगाला गुडबाय करण्याची वेळ आलीय"; फेसबुक पोस्ट करून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 03:50 PM2021-08-28T15:50:53+5:302021-08-28T15:58:31+5:30

Crime News : आई-बाबांची क्षमा मागत आरोग्य दूत म्हणून काम करणाऱ्या एका तरुणाने विष प्राशन केले.

Young man attempts suicide by posting on Facebook in nagpur | "मित्रानो माफ करा, जगाला गुडबाय करण्याची वेळ आलीय"; फेसबुक पोस्ट करून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न 

"मित्रानो माफ करा, जगाला गुडबाय करण्याची वेळ आलीय"; फेसबुक पोस्ट करून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न 

googlenewsNext

नागपूर - जगाला गुडबाय करण्याची वेळ आल्याचे नमूद करून मित्र तसेच आई-बाबांची क्षमा मागत आरोग्य दूत म्हणून काम करणाऱ्या एका तरुणाने विष प्राशन केले. शनिवारी दुपारी १ च्या सुमारास अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. योगेश नासरे (वय अंदाजे २७) असे या तरुणाचे नाव असून, तो अमरावती जिल्ह्यातील वरुड येथील रहिवासी आहे. एका आमदाराच्या रुग्णवाहिकेवर आरोग्य दूत (चालक) म्हणून काम करणाऱ्या योगेशने शनिवारी दुपारी त्याच्या मित्रांना फेसबुकवर एक पोस्ट केली.

'मित्रानो माफ करा. आता जगाला गुडबाय करण्याची वेळ आली. चांगले काम करणाऱ्याला खूप त्रास सहन करावा लागतो', असे सांगून त्याने आपण फुटाळा तलावावर 'लाईव्ह' येणार असल्याचे त्यात नमूद केले. त्याने त्याच्या आई-वडिलांना माफी मागितली. ही फेसबुक पोस्ट वाचून धोका लक्षात आल्यामुळे त्याच्या मित्रांनी ती लगेच व्हायरल केली. नागपूर पोलिसांनी फेसबुक पोस्ट वाचल्यानंतर अंबाझरीचे ठाणेदार डॉ. अशोक बागुल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने फुटाळा तलावाकडे धाव घेतली. योगेश तलावात उडी घेईल, असा अंदाज होता. त्यामुळे या भागातील पोहणाऱ्या काही तरुणांनाही पोलिसांनी लगेच तेथे सज्ज ठेवले.

१ वाजताच्या सुमारास एक तरुण फुटाळा तलावाकडे येत असल्याचे बघून पोलिसांनी त्याच्याकडे धाव घेतली. ते पाहून योगेश बाजूच्या वस्तीकडे धावला. तेथे त्याने खिशातील विषाची बाटली काढून विष प्राशन केले. पोलिसांनी लगेच त्याला मेडिकलमध्ये दाखल केले. तत्पूर्वी रस्त्यात पोलिसांनी त्याचे नाव, गाव, पत्ता जाणून घेतला. त्यानंतर त्याच्या नातेवाईकांना माहिती कळविण्यात आली. मेडिकल मध्ये पोलिसांनी आधीच सूचित केल्यामुळे डॉक्टरांचे पथक योगेशच्या उपचारासाठी सज्ज होते. त्यामुळे त्याच्यावर तातडीने उपचार सुरू झाले. त्याची प्रकृती गंभीर असली तरी स्थिर असल्याचे दुपारपर्यंतचे वृत्त होते.

रुग्णवाहिकेवर चालक म्हणून काम करणारा योगेश वेगवेगळ्या रुग्णांना घेऊन नागपुरात नेहमीच येत होता. त्यामुळे त्याला नागपूरची बऱ्यापैकी माहिती होती. आज तो मोटरसायकलने नागपुरात पोहचला. त्याने विष पिऊन फुटाळा तलावात उडी घेण्याचा विचार केला असावा, असा अंदाज ठाणेदार डॉ. बागुल यांनी व्यक्त केला आहे.

 

Web Title: Young man attempts suicide by posting on Facebook in nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.