धामणगावात प्रेमप्रकरणातून तरुणीची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 19:13 IST2020-01-06T18:46:16+5:302020-01-06T19:13:59+5:30
तरुणाने स्वत:लाही भोसकले, ग्रामीण रुग्णालयात उपचार

धामणगावात प्रेमप्रकरणातून तरुणीची हत्या
अमरावती: शहरातील एका कनिष्ठ महाविद्यालयात बारावीला शिकणाऱ्या १७ वर्षीय तरुणीला प्रेमप्रकरणातून २६ वर्षीय प्रियकराने संपविले. तिला बागेत नेऊन पोटावर चाकूचे वार करण्यात आले. यानंतर प्रियकराने स्वत:च्या पोटातही चाकू भोसकला. या सर्व प्रकरणानंतर मुलावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना सोमवारी दुपारी घडली.
प्रणिता कोंबे असे प्रेमप्रकरणातून हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. ती जुना धामणगाव येथील रहिवासी असून ती सेफला हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात बारावीत शिकत होती. सागर तितुरमारे (२६, रा. दत्तापूर) असे तिला चाकूने भोसकणाऱ्या माथेफिरू तरुणाचे नाव आहे. सोमवारी सकाळी सव्वा अकरा वाजताच्या सुमारास ती कनिष्ठ महाविद्यालयात जात असताना, सागर तिला रस्त्यात गाठून नजीकच्या एका बागेत नेले. तेथे त्यांच्यात किरकोळ वाद झाला. यानंतर सागरने चाकू काढून प्रणिताच्या पोटावर सपासप वार केले. ती जागीच कोसळून ठार झाल्यानंतर सागरने स्वत:च्या पोटात चाकू भोसकून स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाची माहिती मिळताच दत्तापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र सोनवणे ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. गंभीर जखमी सागरला रुग्णालयात हलविले. त्याच्यावर उपचार सुरू आहे. या प्रकरणाचा अधिक तपास दत्तापूर पोलीस करीत आहेत.