रूग्ण बनून आलेल्या तरूणांचा वणीत डाॅक्टरवर चाकूने जीवघेणा हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 14:54 IST2021-04-05T14:53:03+5:302021-04-05T14:54:09+5:30
Attacked on Doctor : डाॅ.मत्ते यांची प्रकृती चिंताजनक: जुन्या वादातून हल्ला केल्याची शंका

रूग्ण बनून आलेल्या तरूणांचा वणीत डाॅक्टरवर चाकूने जीवघेणा हल्ला
वणी(यवतमाळ): येथील रामपुरा वाॅर्डातील डाॅ.पद्माकर मत्ते यांच्या दवाखान्यात रूग्ण बनून आलेल्या दोन युवकांनी डाॅ.मत्ते यांच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. ही खळबळजनक घटना सोमवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने वणीचे वैद्यकीय क्षेत्र हादरून गेले आहे.
डाॅ.मत्ते यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर वणीतील खासगी रूग्णालयात उपचार सुरू असले तरी त्यांची प्रकृती लक्षात घेता, त्यांना पुढील उपचारासाठी नागपुरात हलविण्याची तयारी सुरू असल्याचे त्यांच्यावर उपचार करणार्या डाॅक्टरांनी सांगितले. दरम्यान, वणी पोलिसांकडून हल्लेखोर युवकांचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे.
काही महिन्यांपूर्वी डाॅ.पद्माकर मत्ते यांच्या रूग्णालयातून उपचार घेऊन घरी परत गेलेल्या एका युवकाचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर मृतक युवकाचा भाऊ व अन्य नातलगांनी डाॅ.मत्ते यांच्या रूग्णालयात जाऊन प्रचंड राडा केला होता. त्यात डाॅ.मत्ते यांना मारहाण केली होती. या घटनेनंतर प्रकरण पोलिसांत गेले होते. त्या प्रकरणात मृताच्या भावाला अटकही झाली होती. त्याच प्रकरणाचा वचपा काढण्यासाठी हा जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची शंका पोलिसांना असून त्या दिशेने तपास केला जात आहे.