CAA विरोधात निदर्शने करणाऱ्यांवर अश्लील टिप्पणी केल्याने तरुण अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 21:16 IST2019-12-25T21:16:02+5:302019-12-25T21:16:25+5:30
या घटनेमुळे दोन गटात तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याने कडक पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.

CAA विरोधात निदर्शने करणाऱ्यांवर अश्लील टिप्पणी केल्याने तरुण अटकेत
मडगाव - नागरिकत्व सुधारणा कायदयाविरोधात गोवा वुमन अगेंस्ट एनआरसी अॅंड सीएए संघटनेने केलेल्या निदर्शनावर सोशल मीडियावरून अश्लील भाष्य करून धार्मिक भावना दुखविल्याप्रकरणी गोवा पोलिसांनी एका युवकाला अटक केली आहे. साईप्रसाद नाईक (27) असे संशयिताचे नाव असून, तो दक्षिण गोव्यातील वासुदेवनगर - दवर्ली येथील रहिवाशी आहे. संशयिताला अटक करा अशी मागणी करत आज मुस्लिम धर्मिय मोठ्या संख्येने मडगाव पोलीस ठाण्यात जमले होते. दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक अरविंद गावस यांचीही या जमावाने भेट घेउन त्यांच्याकडे संशयिताला त्वरित अटक करण्याची मागणी केली. नंतर पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेऊन मागाहून रितसर अटक केली.
दरम्यान, आजच्या या घटनेमुळे दोन गटात तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याने दवर्ली भागात कडक पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. संशयित दवर्ली येथे रहात असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून या भागात ज्यादा पोलीस कुमक ठेवली आहे. आयआरबी पोलीस पथक तेथे तैनात केले आहे.
मडगावात काल मंगळवारी गोवा वूमन अगेन्स्ट एआरसी अॅंड सीएए संघटनेने येथील पालिका इमारतीसमोरील उद्यानाजवळ निदर्शने केली होती. फेसबुकवरून त्याची पोस्ट टाकली होती. या पोस्टवर संशयित साईप्रसाद याने अश्लील कॉमेन्टस केली होती. काल सकाळी या निदर्शकांनी पोलीस ठाण्यात येउन संशयितावर कारवाईची मागणी केली. अश्मा सय्यद यांनी मडगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.
भारतीय दंड संहितेंच्या 354 , 509 व 295 (अ) कलमाखाली पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेऊन संशयितावर गुन्हा नोंद केला. मडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गौतम सांळुके पुढील तपास करीत आहेत.